१० वी दिवाळी पहाट

दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ६.३० वाजता मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या आपल्या मंडळात मंडळाच्या अखंड वाटचालीतील दहावी ” रम्य दिवाळी पहाट ” हा नेत्रदिपक कार्यक्रम आनंदात, उत्साहात आणि रसिकांच्या “हाऊसफुल” उपस्थितीत पार पडला, यावेळी स्वप्निल पंडित प़स्तुत ” मेघ मल्हार ” हा सुमधुर मराठी गीतांचा नजराणा सादर करण्यात आला.

               

कार्यक्रमाच्या सुरवातीला मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. रमेशजी शिर्के यांनी सर्व कलाकारांचं आणि रसिक सभासदांचं स्वागत करत सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छया दिल्या. मंडळाचे सरचिटणीस श्री. अजय खामकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यंतरा नंतर कार्यक्रमाचे सूत्र संचालन उत्तम रीत्या केलं. 

                                             

इमारतीच्या प्रवेशद्वारी सौ. ऐश्वर्या ब्रीद, करुणा सावंत यांनी घातलेल्या रांगोळ्या आणि सभागृहात समईच्या दिव्यांची केलेली सजावट रसिकांचे लक्ष वेधत होती. रंगमंचावर श्री. निलेश सुर्वे यांनी लावलेले कंदील आणि सजावटकार श्री. हेमंत भोगले यांनी तयार केलेला लामणदिवा, यामुळे सजावट उठून दिसत होती.

कान तृप्त होणं हल्ली खूप विरळा झालंय, पण मराठा मंडळाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात हा अनुभव आला. सर्वच गायक हे सुरांचे उपासक गायला असताना …कान तृप्त न झाले असते तरच नवल होतं. प्रसन्न मंगलमय सुखद असे वातावरण, चार गायक आणि त्यांचा वाद्यमेळ, एका बाजूला मंदार खराडे सारखा कसलेला निवेदक..! सुरांना दैवत मानणारी सर्व गायक, रसिकांचे कान तृप्त करत होती.

पहाटेच्या रम्य आणि प्रसन्न वातावरणात ‘घनश्याम सुंदरा’ या भूपाळीने दिवाळी पहाट या संगितिकी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्या पाठोपाठ, अभिषेक मारोटकर यांनी भक्तिपूर्ण स्वरात गायलेल्या ‘सूर निरागस हो’ या गाण्याने, मंगलमय वातावरण निर्माण केले.

                                                

सर्वच गाणी इतकी सुरेल गायली कि रसिक प्रेक्षकही तल्लीन झाले. सर्व गाण्यांचा परामर्ष इथे घेणे शक्य नाही, पण काही गाण्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.  या मध्ये गायक संतोष पाटील यांनी ‘आधी रचिली पंढरी’ हे गाणं गाताना एक अत्यंत निकोप, काळजाचा ठाव घेणारा घोटीव, सुरांना पक्का असलेला आवाज मराठा मंडळाच्या  रंगमांच्यावरून सुरांची उधळण करू लागला. अभिषेक मारोटकर यांनी ‘फिरत्या चाकवरती देसी’  हे गाणे अतिशय सयंत सुरात सादर केले.  संतोष पाटील यांनी माझे माहेर पंढरी … हे गाण गाताना ‘माहेरची आठवण’ साठी घेतलेली जागा निव्वळ अप्रतिम. या गाण्याला वन्स मोर देखील मिळाला. पंढरपूर ते गाणगापूर हा सांगीतिक भक्ती गीतांचा प्रवास करताना सर्व रसिकांनी “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’  असा कोरस देऊन वातावरण भक्तिमय केले.

‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हे गाणं गात गायक अभिषेक मारोटकर यांनी रसिकांना नरसोबाच्या वाडीला घेऊन गेले आणि खच्चून भरलेलं मराठा मंडळाचे सभागृह  भक्ती रसाच्या पुरात आकंठ बुडालं. आनंदानी डोलू लागलं, न कळत टाळ्यांचा ताल धरला जात, त्या टाळ चिपळ्यांच्या नादात त्या विठ्ठलाचरणी लीन झालं.

निवेदक मंदार खराडे यांचे “मराठीपण म्हणेज काय’ हे सांगताना केलेले निवेदन प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे होते.  त्यांच्या खुशखुशीत आणि ओघवत्या शैलीत केलेल्या निवेदनामुळे कार्यक्रमाची उंची वाढली. 

 

‘कुश लाव रामायण गाती’ हे गाणं अभिषेक मारोटकर यांनी  खूप छान गायलं. गाण्यात अपॆशीत असलेले सर्व भाव त्यांच्या स्वरात पुरेपूर उतरले होते. ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’  हे एव्हरग्रीन गाणं स्वराली पांचाळ यांनी इतक्या आंनदी स्वरात गायल्या कि रसिकांचीही मान त्यावर डोलत होती आणि तबला, ढोलक आणि सर्व वादकांचा अचूक मेळ साधला होता. अमृता दहीवेलकर यांनी ‘कारे दुरावा कारे अबोला हे गाणं हळुवार नजाकतीने पेश केलं.

संतोष पाटील यांना versatile आवाजाची मिळालेली देणगी, ज्या भक्तीपूर्ण आवाजात त्यांनी भक्ती गीत गायली तसाच अपॆशीत भाव त्यांनी गायलेल्या ‘पाहिले न मी तुला’ या प्रेमगीत सुद्धा होता. स्वराली पांचाळ यांचे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली हे गझलच्या अंगानं जाणार गाणं सुंदर झाल.  

अभिषेक मारोटकर यांनी गायलेले “तोच चंद्रमा नभात” हे गाणं अप्रतिम आणि ” रंगात रंग तो शाम रंग” हे गाणं गाताना सर्व रसिकांनी मोबाईल मधील टॉर्चच्या प्रकाशाचा वापर करायला सांगून हे वेगळा माहोल बनविला होता

      

तसेच संतोष पाटील यांचं “मायेच्या हळव्या” या गाण्याचा प्रणय गीत खूप छान मूड सांभाळत सादर करून वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. मग सुरू झाला प्रवास, नाट्यगीतांचा अवीट प्रवाह.. संतोष पाटील यांनी गायलेल्या हे सुरांनो चंद्र व्हा, मर्म बंधातली ठेव ही, प्रिये पहा या शिवाय देवाघरचे ज्ञात कुणाला आणि घेई छंद मकरंद  अशी एकामागून एक लडी उलगडत होती आणि रसिक त्या आनंद प्रवाहात अत्यानंदाने सुरांच्या डोहात नखशिखांत डुंबत होतो. प्रत्येक आलापी, ताने नंतर प्रेक्षकांतून आपोआप उमटणारे, अहाहा, क्या बात है चे उद्गार….!  बऱ्याच जेष्ठ रसिकांसाठी ही नाट्य गीतांची मेजवानी होती. त्यांचा जुन्या ऐन उमेदीच्या दिवसांची आठवण करून दिली हे मात्र  नक्की ….!

                                           

अमृता दहिवेलकर यांनी गायलेली “रेश्माच्या रेघांनी ..  ” हि लावणी तर भन्नाट होती. या लावणीला नखरा, ठसका तिच्या आवाजांत छान उतरला होता. शिट्या आणि टाळ्यांनी लावणीला हवा असलेला प्रतिसाद मराठा मंडळाचा रसिक देत होते. सुरेश वीर यांची ढोलकी वाजली नाही तर बोलली, एव्हढा अप्रतिम तोडा लावणीच्या आधी त्यांनी वाजविला. 

                                                      

                                           

मध्यंतरानंतर सर्व गायकांनी गायलेल्या कोळी गीतांनी धमाल उडवली आणि बहार आणली.सर्व गाण्यांना रसिक प्रेक्षक उस्फूर्तपणे प्रदिसाद देत होते. काही जण तर कोळीगीतांनाही नाचून आणि शिट्या वाजवून रसिकांनी दाद दिली.

गायनाच्या कार्यक्रम रंगदार होण्यासाठी गायकांना आणि गायिकांना वादकांची सुरेल साथ आवश्यक असते, ह्या कार्यक्रमातही संगीत संयोजक स्वप्नील पंडित तबला, सुरेश वीर ढोलकी, अतुल माळी आणि कल्पेश मेस्त्री  यांची कीबोर्ड वर उत्कृष्ट साथ दिली, त्यामुळे कार्यक्रम अधिकच रंगदार झाला.

                                           

या श्रवणीय कार्यक्रमात गायक कलाकार  संतोष पाटील, अभिषेक मारोटकर , अमृता दहीवेलकर, स्वराली पांचाळ या गायक यांनी वेगवेगळ्या बाजात व ढंगात गाऊन रसिकांची मने जिंकली. एकंदरती कार्यक्रम बहारदार झाला. कांन व मन तृप्त होऊन तीन साडेतीन तास कसॆ गेले कळलेच नाही.

असा कान, डोळे तृप्त करणारा, तरीही मन अतृप्तीच्या हिंदोळ्यावर झुलणारा अनुभव दिल्याबद्दल कलाकारांचे  आभार शब्दांत मांडणं कठीण……! हीच अतृप्तीची तृप्ती अनुभवत, ह्या कार्यक्रमाची आस, त्याचा नाद कानात, मनात निनादात रहाणार एवढं नक्की!….. रसिकांच्या कायम स्मरणात राहिलेली ही दिवाळी पहाट, रसिकांच्या मनात कितीतरी दिवस रुंजी घालेल यात शंकाच नाही.

या दिवाळी पहाट निमित्त प़तिवर्षा प़माणे याही वर्षी तळमजल्यापासून सभागृहापर्यंत नयनरम्य रोषणाई, रांगोळ्या, व दिव्यांची आरास करण्यात आली होती. मंडळाचे कार्यकारी मंडळ, सांस्कृतिक प्रमुख सौ. रश्मी राणे, निमंत्रक सौ. करुणा सावंत, आणि सर्व सांस्कृतिक समिती सदस्य, महिला आघाडी सदस्य, विविध समित्या, सेवक वर्ग, श्री लक्ष्मी कॅटरर्स, महिला वर्ग अशा सर्व कार्यकर्त्यांनी आणि सेवक वर्गाने परस्पर समन्वयाने, सहभागाने हा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी केला. या वेळी दिवाळी अंक वितरणाचा शुभारंभ आणि मान्यवरांचे व प़ायोजकांचे सन्मान करण्यात आले.  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम संपल्या नंतर रसिकांना पावभाजी आणि गुलाब जामच्या अल्पोपहारची सोय केली होती, त्यावर रसिकांनी यथेच्छ ताव मारत अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद दिला.

एक नितांत सुंदर कार्यक्रम बघून रसिक मंत्रमुग्ध झाले. काही क्षणचित्रं खास आपल्यासाठी……!