मंडळाचा इतिहास

मंडळाचा इतिहास

१५ ऑक्टोबर २०११ सांस्कृतिक केंद्र इमारत सर्वार्थाने पूर्ण – उदघाटन सोहळा

सांस्कृतिक केंद्र इमारत सर्वार्थाने पूर्ण होऊन संपूर्ण इमारतीचे भोगवटापत्र महानगर पालिकेकडून मंडळास मिळाले. या स्वप्नपूर्तीचा आनंद सर्वांनी एकत्रित पणे उपभोगावा, मंडळाच्या कार्याचा प्रसार, प्रचार व सादरीकरण मोठ्या प्रमाणात व देखण्या स्वरूपात केला. मंडळाच्या सांस्कृतिक केंद्र इमारती समोरील रस्त्यावर भव्य सभा मंडप व तितकाच प्रशस्त रंगमंच उभारून उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या साठी कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून उभारलेले व्यासपीठ व त्यावरील देखणा रंगमंच अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. मंडळाच्या सांस्कृतिक केंद्राचे उदघाटन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मा.ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते व खासदार श्री.संजय दिना पाटील, आमदार सरदार तारासिंह , आमदार शिशिर शिंदे, नगरसेवक श्री.प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक श्री. नंदकुमार वैती इ. मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी मा.ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते श्री. नितीन चंद्रकांत देसाई याना एक सुंदर व संस्मरणीय अशी भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी श्री. रमेश शिंदे यांच्या सौजन्याने संकल्पित केलेल्या सरस्वती वाचनालयाचे उदघाटन सुद्धा ना.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या दिवशी सकाळ पासूनच इमारतीमध्ये विविध धार्मिकविधि बरोबरच श्री. जनार्दन वामन राणे यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे क्षात्रतेज श्री तुळजाभवानी मातेच्या सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना व त्या छोटेखाणी मंदिराचा शुभारंभ करण्यात आला. या नेत्रदीपक अशा सोहळ्याप्रसंगी दूरदर्शनवर गाजलेला “मराठी पाउल पडते पुढे!” हा विविध व लोकप्रिय कलावंतानी सादर केलेला देखणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्वांगसुंदर सभारंभासाठी उभारण्यात आलेला भव्य सभामंडप उपस्थितांनी ओसंडून गेला होता. यावेळी तळमजला व पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक पद्धतीचे प्लाझमा टी.व्ही. सेट्स बसविण्यात आले होते. अनेकांनी हा सोहळा त्या पडद्यावर पाहण्याचा आनंद लुटला. या नयनरम्य सोहळ्याचे संपूर्ण निवेदन सुप्रसिद्ध निविदिका उत्तरा मोने यांनी उत्तम प्रकारे केले. तमाम मुलुंडकरांबरोबरच मुंबई, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई अशा विविध ठीकाणाहुन आलेल्या अनेक हितचिंतक मित्रांनी, सभासदांनी व काही संस्था प्रतिनिधीनि मुलुंड मराठा मंडळाच्या या सर्वांगसुंदर सोहळ्याचा मुक्त कंठाने गौरव केला.

१० मे २००६ – वास्तुशांती व श्री सत्यनारायणाची महापूजा

सुमारे २५-३० वर्षांपासून मनाशी बाळगलेल्या संकल्पनेच्या पूर्णत्वाचा मंगल दिवस उजाडला तो मराठा मंडळाच्या एक मजली वास्तूच्या शुभारंभाचा! या सांस्कृतिक केंद्र इमारतीचा वास्तुशांती धार्मिक सोहळा व त्या निमिताने श्री सत्यनारायणाची महापूजा असा सभारंभ दिनांक १० मे २००६ रोजी मंडळाच्या वास्तूमध्ये आयोजित करण्यात आला होता.

२९ मे २००५ – कै. वसंतराव सकपाळ चौक

मंडळाचे पहिले अध्यक्ष कै. वसंतराव सकपाळ यांच्या सामाजिक तसेच राजकीय कार्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेने यथोचित गौरव करून मंडळाच्या वास्तू जवळच्या चौकाचे कै. वसंतराव र. सकपाळ चौक असे नामकरण करण्यास मंजूरी दिली. त्यानुसार दि. २९ मे २००५ रोजी मुंबईचे महापौर मा. श्री. दत्ताजी दळवी यांच्या शुभहस्ते व स्थानिक नगरसेवक श्री. नंदकुमार आ. वैती यांच्या अध्यक्षतेखाली नामकरण सोहळा पार पडला. यावेळी काही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

३१ ऑक्टोबर २००४ – भाग्यवान देणगीदार योजना

इमारत बांधकाम निधी अभावी बंद पडू नये म्हणून निधी जमविण्याचे विविध मार्ग अवलंबिण्यात आले. त्यापैकी एक भाग्यवान देणगीदार योजना ! प्रतेकी १०० रु. दराने कुपन काडून त्यातील भाग्यवान विजेते ठरवण्यासाठी एक सोडत दि. ३१ ऑक्टोबर २००४ रोजी काढण्यात आली. या योजनेमधून सभासदांच्या उस्फुर्त सहभागामुळे खर्च व बक्षिसे जाउन ११ लाख रुपयांचा इमारत निधी जमविण्यात आला.

५ एप्रिल २००० – मंडळाच्या गौरवशाली वास्तुचा पायाभरणी सभारंभ

मंडळाच्या संकल्पित सांस्कृतिक केंद्र इमारतीच्या बांधकामाचा आराखडा वास्तुविशारद श्री. संजय आयरे यांनी महापालिकेकडे सादर केल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम सुरवात करण्यास परवानगी मिळाली. दि. ५ एप्रिल २००० रोजी गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुप्रसिद्ध मा.श्री.बी .जी. शिर्के यांच्या शुभहस्ते व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात व अमाप उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी मा. शरदराव पवार यांचा शुभ संदेश आला होता.

२१ ऑक्टोबर १९९६ – स्वप्नपूर्तीचा मंगल शुभारंभ

मुलुंड मधील तमाम मराठा बंधु भगिनींनी इच्छा बाळगलेल्या एका सांस्कृतिक केंद्र इमारत बांधकाम संकल्पनेला सुरवात झाली. या वास्तूशिल्पाच्या उभारणीसाठी मंडळाने वेळोवेळी अनेक उपक्रम, कार्यक्रम व योजना आखल्या. निधीपुस्तके, सभासद वर्गणी, नाट्यप्रयोग, बक्षिश योजना, स्मरणिका जाहिराती, देणग्या, ठेवी , कर्ज उभारणी इ. विविध मार्गांनी निधी उभारण्याचे काम चालू केले. दिनांक २१ ऑक्टोबर १९९६ रोजी मंडळाच्या भूखंडावर सांस्कृतिक केंद्र इमारतीचा मंगल शुभारंभ भूमिपूजनाच्या देखण्या सोहळ्याने करण्यात आला. मंडळाचे एक हितचिंतक व मार्गदर्शक आदरणीय डॉ. राममनोहर त्रिपाठी यांच्या शुभ हस्ते, मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष मा. श्री. गोपाळराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पायाभरणी सभारंभ करण्यात आला. स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने मंडळाने टाकलेले ते एक दमदार पाउल ठरले!

माहे डिसेंबर १९८९ – भूमी पूजन सोहळा

मंडळाने केलेल्या अथक प्रयत्नाना लाभलेले यश म्हणजे महाराष्ट्र शासनाने काही अटी व शर्तीसह मंडळाला मुलुंड पूर्व येथील केळकर महाविद्यालयाजवळ १५५०.७५ चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाचा दिलेला भूखंड ! अडचणीचा व दलदलीचा हा भूखंड इ.स. १९८९ च्या अखेरीस मंडळाने ताब्यात घेऊन तो विकसित केला. त्यावर भरणी घालून सपाटीकरण करणे, कुंपण घालून तो सुरक्षित राखणे इ. साठी त्या काळात सुमारे पाच लाख रुपये खर्च करून तो बांधकामास योग्य करून घेतला.

१५ ऑक्टोबर १९७८- कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेची स्थापना

सांस्कृतिक श्रीमंती लाभलेल्या प्रगतशील मुलुंड या उपनगरात सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक जीवनात मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचे स्थान अनन्य साधारण आहे . समाजाची सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक भूक भागवण्यासाठी आणि मुलुंड या उपनगरात नवीन रहावयास आलेला परंतु विखुरालेला मराठा समाजास एकत्र आणून त्यांचाशी वैचारिक देवाण घेवाण करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन एकत्रितपणे उपाय शोधण्यासाठी १५ ऑक्टोबर १९७८ रोजी कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचा जन्म झाला. मंडळाच्या स्थापनेपूर्वी व नंतर वैचारिक व संघटनात्मक मार्गदर्शन देण्याचे , सुयोग्य दिशा देण्याचे काम मंडळाचे एक संस्थापक व माजी अध्यक्ष कै. पूज्य वसंतराव सकपाळ यांनी केले. तसेच कै. पूज्य वसंतराव सकपाळ, कै. पूज्य धनाजीराव कदम, कै. पूज्य चंद्रकांत देसाई, कै. पूज्य राजाराम महाडिक , सर्वशी जयरामराव भोसले , श्री. गोपाळराव भोसले, कृ. बा. शिर्के, रमेश शिर्के, प्रा. एकनाथ घाग , बळीराम माने इत्यादींच्या प्रयत्नातून मानस सरोवरातून मराठा मंडळ मुलुंड, मुंबई मुंबई हि गंगा उदय पावली.