समाजातील कांही मान्यवर व कलाकारांच्या आपल्या मंडळासंबंधी कांही बोलक्या प्रतिक्रिया

डॉ. सौ.कमलताई ठकार
सेवा निवृत्त प्राचार्या, औसा–लातूर महाविद्यालय

एकाच वेळी विभिन्न पातळीवरुन जीवनाचा वेध घेण्याचं सामर्थ्य ज्या संस्थामध्ये आहे त्यापैकीच मराठा मंडळ मुलुंड, मुंबई ही संस्था आहे. या मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केला ही फार आंतरिक साक्षित्वाची बाब आहे. शून्यवत सगळं असताना सुध्दा स्वकर्तृत्वाने, तळमळीने आणि समर्पणाच्या भावनेनं शून्यातून सुध्दा देवाच्या वसाहती निर्माण करता येतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे ‘‘मराठा मंडळ मुलुंड, मुंबई आहे’’. स्वरगंगा, ज्ञानगंगा या दोन्हींचा समन्वय ज्या एका प्रयाग तीर्थावर झाला ते प्रयाग तीर्थ म्हणजे हे मंडळ आहे. या मंडळाच्या वास्तुमध्ये प्रवेश करतानाच अगदी प्रसन्न वाटते. इथे एक झुळझुळणारा चैतन्याचा झरा आहे, चिन्मयाची खाण आहे आणि या ठिकाणी असणारी माणसं स्वतःला सर्वस्वाने समर्पित करुन काम करायला उभी आहेत हे इथे जाणवतं.
विविध क्षेत्रामध्ये काम करीत असताना या मराठा मंडळाचा प्रवाह सर्वदूर पोहचला आहे. इतक्या उत्तम रीतीने समाजातल्या सद्‌गुणांची दखल घेणे आणि कौतुकाचा सत्कार करणं यासाठी फार मोठं मन लागतं. ज्या ठिकाणी खोली आणि उंची असते अशी माणसं जेव्हा पदाधिकारी म्हणून काम करतात त्यावेळेला संस्थेला उज्ज्वल भवितव्य असतं. या मंडळाच्या महिला सुध्दा फार उत्साही, गुणी व कर्तबगार आहेत. या मंडळात कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संस्थेचा भविष्यकाळ निश्चितपणे उज्ज्वल आहे. या संस्थेला व कार्यकुशल कार्यकर्त्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

ॲड. शशिकांत पवार
अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

मुंबई शहरात गेली चाळीस वर्षे सलग व एकत्रितपणे कार्य करीत स्वतःची भव्य दिव्य व पवित्र वास्तू उभारणारी, मराठा मंडळ मुलुंड, मुंबई ही एका ज्ञातीची असूनही उत्तम समाजकार्य करणारी नामवंत संस्था आहे. या मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के व त्यांचे सर्व सहकारी व कार्यकर्ते यांचे विशेष अभिनंदन! जुन्या विचारांचा आदर राखून, नविन विचारांना आत्मसात करीत तरुण मंडळीचा सहभाग व सहयोग घेऊन नविन तंत्रज्ञान उपलब्ध करुन मंडळाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. समाजाला आवश्यक असणाऱ्या वाचनालय, अभ्यासिका, वधू-वर सूचक मंडळ, संगणक व विज्ञान कक्ष अशा एक ना अनेक गोष्टी व सोयी उपलब्ध करुन देणारी संस्था ही समाज कार्यकर्त्यांना खरोखरच मार्गदर्शक आहे. मंडळाच्या वाटचालीस अधिकाधिक यश मिळो, नवनविन योजना व संकल्पना यशस्वी होवोत, समाजात जास्तीत जास्त जागृती निर्माण होवो अशी आशा बाळगून ‘‘मराठा मंडळ मुलुंड, मुंबई’’ या संस्थेला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

भा. ल. महाबळ
ज्येष्ठ साहित्यिक

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई ही संस्था पूर्व मुलुंडचे वैभव. संस्थेची भव्य वास्तू,नेटकी व सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. पण केवळ त्यामुळे ही संस्था वैभवसंपन्न बनलेली नाही. संस्था श्रेष्ठत्वाला पोहचते ती कार्यकर्त्यांमुळे. या संस्थेकडे निःस्वार्थी, विवेकी व कर्मयोगी कार्यकर्त्यांची मांदियाळी आहे. ही संस्था सामाजिक कार्यात सहभागी होण्याकरिता नेहमीच सज्ज व उत्सुक असते. या संस्थेची वास्तू मला त्यामुळे एक मंदिरच वाटते. संस्थेच्या भावी वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

श्री. चंद्रशेखर वझे
अध्यक्ष, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड

मराठा मंडळ ही मुलुंड पूर्वेची संस्था मुंबईच्या पूर्व उपनगरात, तिच्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे नावारुपाला येत आहे. नावाने जरी ही ज्ञातिसंस्था असली तरी समाजातील सर्व लोकांसाठी सुसज्ज सभागृहे उपलब्ध असतात. संस्थेने आयोजिलेल्या कार्यक्रमांमध्ये सर्व ज्ञातींच्या नागरिकांना प्रवेश असतो. मराठी नाट्य परिषद, महाराष्ट्र सेवा संघ, आचार्य अत्रे जयंति उत्सव समिती फॉर्च्यून एंटरन्टेमेंट आणि इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या संस्थेत नाटक, संगीत अनेक विषयांवर प्रबोधन असे पुष्कळ उपक्रम आयोजिले जातात आणि त्यांना रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतो.
संस्थेचे व्यवस्थापन सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या सुस्वभावी लोकांच्या हाती आहे. पूर्वी असंख्य कार्यकर्त्यांनी कष्ट करुन, त्याग करुन संस्थेला आजच्या सुस्थितीत आणले. या संस्थेत एकोपा नांदून संस्थेचा अखंड उत्कर्ष होवो आणि ज्ञान, मनोरंजन आणि समाजसेवा या क्षेत्रातील उच्च गुणवत्तेचे उपक्रम येथे लोक सहभागातून घडत राहोत ही सदिच्छा मी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने व्यक्त करतो. अभिप्राय लिहण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष मा. श्री. रमेश शिर्के यांचे आभार.

श्री. यशवंत ब. क्षीरसागर
अध्यक्ष, सानेगुरुजी बालविकास मंदिर, संस्थापक-संपादक, ‘बालविकास मंदिर मासिक’

सर्व सामान्यांची प्रबळ इव्छा शक्ती, ध्येयवादी नेतृत्व व उत्तम संघटन या त्रिवेणी संगमावर उभी राहिलेली देखणी वास्तू म्हणजे मराठा मंडळ मुलुंड, मुंबई-सांस्कृतिक केंद्र इमारत, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात दुष्टांचा दुष्टपणा देखणी वास्तू म्हणजे मराठा मंडळ मुलुंड, मुंबई-सांस्कृतिक केंद्र इमारत, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा व्हावा, त्यांच्यात सत्कर्माची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे’’असे उद्‌गार काढले आहेत. मनुष्यातील याच मित्र भावनेचा किंबहुना संघशक्तीचा जेव्हा परमोत्कर्ष होतो तेव्हाच ‘‘मराठा मंडळ मुलुंड, मुंबई ’’ यासारखे भव्यदिव्य प्रकल्प अवघ्या चाळीस वर्षात उभे रहातात. या वास्तुचे बांधकाम प्राथमिक अवस्थेत असताना संयोजकांच्या याच ठिकाणच्या आयोजनात संपूर्ण गीता पारायणात सहभागी व्हायचे भाग्य आम्हाला लाभले होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या जडणघडणीत अशा लोकहितदक्ष व लोकसेवी संस्थाना असाधारण महत्त्व आहे. जनसामान्यांच्या विवेक शक्तीला आवाहन करून जनमन सुसंघटित, सुसंबध्द व राष्ट्रहितकारक बनविण्याचे महत्त्वपूर्व कार्य अशा संस्थांद्वारा नकळत होत असते. त्यात या मराठा मंडळाचा फार मोठा वाटा आहे. मराठा मंडळाने ४० वर्षांच्या वाटचालीत यशस्वी केलेले अनेकविध लोकप्रबोधनकारक उपक्रम, कार्यक्रम आयोजित करून जनसामन्यांच्या कर्तृत्व शक्तीला आवाहन केले आहे याची साक्ष पदोपदी येते. देखणी वास्तु, कार्यक्रमांचे शिस्तबध्द आयोजन, उत्तम व्यवस्थापन व खंबीर नेतृत्व यामुळे ही संस्था अधिकाधिक नेत्रदिपक यश प्राप्त करील यात तिळमात्र संदेह नाही. मंडळाच्या भावी वाटचालीस माझ्या अंतःकरण पूर्वक शुभेच्छा!

कविवर्य अशोक नायगावकर

मुलुंड मराठा मंडळाच्या या देखण्या वास्तुमध्ये प्रवेश करतानाच अगदी प्रसन्न वाटते. प्रवेश द्वारावरील श्री तुळजाभवानी मातेची तेजस्वी मूर्ती पाहूनच मनात भक्तीभाव निर्माण होतो. या वास्तूमधील उपलब्ध असलेल्या सेवा सुविधांची माहिती घेतल्यानंतर या वास्तुच्या रुपाने मराठा मंडळाने सर्वोत्तम सामाजिक कार्य चालिवले असल्याची जाणीव निर्माण होते. या इमारतीमधील विविध कक्ष, वातानुकुलित सभागृहे, वाचनालय, अभ्यासिका, मंडळाचे कार्यालय, सभा दालन अशा सर्व व्यवस्था पहाताना या मंडळाबाबत मनात आपोआपच आदर भाव निर्माण होतो. मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा!

मंदार आपटे
सुप्रसिध्द गायक

कलाकार हा बहुतेक वेळा लहरी वाटतो. मी स्वतःकडे एक गायक कलाकार म्हणून जेव्हा पहातो तेव्हा कार्यक्रमाच्या मानधनापेक्षा मी अन्य गोष्टी बरोबरच कार्यक्रमाची जागा कोणती व कशी आहे या गोष्टीला सुध्दा महत्त्व देतो. देश-विदेशात कार्यक्रम करीत असताना काही खास जिव्हाळ्याच्या, जवळच्या व नकळत हक्काच्या वाटणाऱ्या काही संस्था / मंडळे डोळयासमोेर येतात. असाच एकदा मनामधला ुददुत र्स्ीज् दिसू लागला. मग पृथ्वी, भारत, महाराष्ट्र, मुंबई असं करत करत मुलुंडमधील मराठा मंडळाशी येऊन थांबला. फॉर्च्युन आणि मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक पत्की, मंगेश पाडगावकर, सुधीर फडके अशा उत्तमोत्तम संकल्पनांचे कार्यक्रम मी इथे केले आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था असलेलं देखणं, प्रेमाने जपलेलं असं सभागृह, आम्हाला गाताना सकारात्मक उर्जा देऊन जातं. अशाच एका रंगलेल्या कार्यक्रमात माझे खास कौतुक करण्याच्या हेतूने या मंडळाचे अध्यक्ष शिर्के काकांनी मला मंडळाची वास्तूप्रतिमा भेट दिली, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भारावलेला होता. उत्तमोत्तम कलाकारांची इथे सतत उठबस होवो हिच सदिच्छा!! मराठा मंडळाच्या या वास्तूला माझा साष्टांग दंडवत.

दिपाली केळकर
निवेदिका

सुमारे ४/५ वर्षांपूर्वी मुलुंडच्या मराठा मंडळात महिला दिनानिमित्त कार्यक्रम केला तेव्हापासून मंडळातील महिला आघाडी प्रमुख सौ. चित्रा धुरी व अरुण चव्हाण यांच्याबरोबर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी, सदस्यांशी छान नातं तयार झालं. मंडळाच्या या देखण्या सभागृहात संस्कार भारती, फॉर्च्युन व मराठा मंडळ, दिगंबर प्रभू या सर्वांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने या मंडळाशी नातं अधिक आपुलकीच झालं. बदलापूरमधील आम्ही काही कलाकारांनी मिळून तयार केलेला ‘‘ऋतुगंध’’ हा कार्यक्रम मंडळाने आयोजित केल्यामुळे हे बंध अधिक घट्ट झाले. या संस्थेची देखणी वास्तू व या वास्तूत शिरल्याबरोबर समोरच श्रीदेवी तुळजाभवानीच्या दर्शनाने लाभणारी प्रसन्नता, सगळयात महत्त्वाचं म्हणजे मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांची रसिकता, त्यांची स्नेहमय वागणूक आणि आदारातिथ्य यामुळे मी नकळत या संस्थेशी जोडली गेले. या मंडळाच्या पुढील दमदार वाटचालीस मनापासून शुभेच्छा!

कु. रिध्दी म्हात्रे
लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा , प्रथम क्रमांक विजेती

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई ही संस्था आम्हा तरुणांसाठी अत्यंत स्तुत्य उपक्रम नेहमीच आयोजित करीत असते. मराठी साहित्य, संस्कृती अनेकविध कला इ. जोपासण्यासाठी मराठा मंडळाचा फार मोठा वाटा या क्षेत्रात आहे. या मंडळाच्या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम दर्शन होते ते महाराष्ट्राचे क्षात्रतेज असलेल्या श्री तुळजाभावानी मातेच्या सुंदर मंदिराचे! या सुंदर व देखण्या इमारतीमध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जेव्हा येतो तेव्हा येथील कार्यकर्त्यांचे आदरातिथ्य व विनयशीलतेने भारावून जातो. इथले काका, काकी, ताई, दादा अगदी आजी आजोबा सुध्दा कर्तव्याच्या व सामाजिक जाणीवेच्या भावनेने व उत्साहाने काम करताना पाहून खूपच आनंद वाटतो. तरुण वर्गाला आदर्श व दीपस्तंभाप्रमाणे असणाऱ्या या संस्थेचा आम्हाला नितांत आदर वाटतो. या संस्थेच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!