*”मातृसंस्कृती आणि पूज्य साने गुरुजी”*

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई आयोजित विशेष व्याख्यान – *”मातृसंस्कृती आणि पूज्य साने गुरुजी”*

*स्थळ : मराठा मंडळ, मुलुंड, मुंबई*
*रविवार दिनांक २१/०६/२०२६*
*वेळ : सायं. ठीक ५.०० वा.*

स्वामी विवेकानंद, पूज्य साने गुरुजी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असलेल्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा भूतपूर्व प्राचार्या *डॉ. कमलताई ठकार (आझाद महाविद्यालय – औसा, लातूर)* यांचे *”मातृसंस्कृती आणि पूज्य साने गुरुजी”* या विषयावरील व्याख्यान *रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता* आयोजित करण्यात आले आहे.

पूज्य साने गुरुजींच्या ७६ व्या पुण्यस्मरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या व्याख्यानात मातृसंस्कारांचे महत्त्व, भारतीय संस्कृतीची मूल्यपरंपरा आणि पूज्य साने गुरुजी यांच्या जीवनातून व विचारांतून समाजाला मिळणारी प्रेरणा यांचा वेध घेतला जाणार आहे. हे व्याख्यान निश्चितच सर्वांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरणार आहे. तरी सर्व सभासद, हितचिंतक व नागरिकांनी या विचारपर्वाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

दिनांक २१ मार्च २०२६ रोजी मराठा मंडळ, सांस्कृतिक केंद्र इमारत, मुलुंड यांनी लातूरच्या माजी प्राचार्या डॉ. कमलताई ठकार यांचे साने गुरुजींच्या ७६व्या स्मृतिदिनानिमित्त मातृसंस्कृती व पूज्य साने गुरुजी या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

मराठा मंडळाच्या वास्तुत आई तुळजाभवानीच्या प्रसन्न मंगलमय दर्शनाने असा कार्यक्रम पाहता, ऐकता येणे म्हणजेआम्हां श्रोत्यांचे भाग्यच !
वय ७८, लहानसर चणी, ” मूर्ती लहान पण कीर्तीने मोठ्या ” असणाऱ्या कमलताईंच्या मुखातून निघणारे एक एक शब्दांचे मोती आम्ही हृदयात साठवून घेत होतो. स्पष्ट उच्चार, खणखणीत आवाजाने युक्त असे रसाळ वक्तृत्व. नॉन स्टॉप सव्वा तास फक्त समोर श्रोत्यांकडे पाहून त्यांचे चेहरे वाचत व्याख्यानात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होत्या.

कमलताईंनी ओघवत्या भाषेत सुंदर श्लोकाने सुरुवात करत, मराठा मंडळास देववृक्ष व सांस्कृतिक ऊर्जा केंद्र म्हणत, सत्य शिव सुंदर यांचे प्रकटीकरण कथन केले. पूज्य साने गुरुजींचे प्राकृतिक, पौरुष व दैवी जीवन सांगितले. प्राकृतिक म्हणजे निसर्गावर प्रेम. माणूस पक्षी, प्राणी, निसर्ग यातील संवाद. निसर्गावर प्रेम करताना सांगितलं, मायेने लावलेल्या झाडांवर विश्वास दाखविल्यावर झाडेही आपल्यावर प्रेम करतात.

त्यांनी आकाशाला अंबर ही उपमा दिलेली आहे. जसे आकाशात , सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असते. पृथ्वी व आकाश यातील सीमा म्हणजे क्षितिज ! हे क्षितिज म्हणजे संयम. त्याचप्रमाणे मानवाने आकाशाप्रमाणे शांत असावे त्यामुळे आत्मबल वाढते.

“पौरुष” हा पराक्रम असतो. कर्तुत्वसंपन्न जीवन जगता आले पाहिजे. साधे व्यक्तिमत्व आणि प्रेम म्हणजेच मोक्ष, त्याग,समर्पण, निरपेक्ष प्रेम, ” खराची एक तो धर्म जगाला प्रेम अर्पावे.” मंदिराचा कळस व पाया यातील फरक दाखविला. मंदिराचा पाया लक्षात घेऊनच कळसाची उंची बांधली जाते. त्याचप्रमाणे माणसाने कुठे पोहोचायचे आहे ते ध्येय लक्षात घेतले पाहिजे.

“दैवी जीवन” हे नियतीने ठरवलेलं असतं. तरी साने गुरुजींनी आत्महत्या का केली हा प्रश्न निर्माण होतो. साने गुरुजींचे जीवन हे अंतरंगातून अध्यात्मिक होते. त्याचा त्यांना अर्थ कळला होता. या महापुरुषाला धर्माच्या साधनेत देह अपुरा पडतोय हे कळल्यामुळे, मरणाचे वास्तव जाणवले.

अखंड ज्ञानसाधना वाढविण्यासाठी माणसाने सतत वाचन-चिंतन- मनन केले पाहिजे. ज्ञानाचा डोक्याला आधार असावा पण त्याचे ओझे होऊ नये.
कारण नसताना खोटे बोलाल तर जीवनात, संघर्षाच्या क्षणी खरे बोलण्याची शक्यता कमी होते.

“आईचे महत्व” यावर साने गुरुजींनी कितीतरी ओव्या लिहून ठेवल्या आहेत. आई, ही शांत समईसारखी असते. काळावर दमदार पावले उमटविणे म्हणजे आईने केलेला संस्कार. आई म्हणजे माया, जिव्हाळा, प्रेम, देव्हारा, आईचा वेलू गगनावरही मावेना. माया हा शब्द म्हणताना ” ओठाला ओठं भिडे पण मावशी म्हणताना अंतर पडे. ” “या देवी सर्वभूतेषु, मातृरुपेण संस्थिता,नमस्तसै नमस्तसै…” आईला जगन्माता म्हणून तिच्या पायावर डोकं ठेवावं. पायाला नमस्कार करण्यामध्ये, थोरा मोठ्यांच्या डोक्यामधील जे बुद्धिमत्तेचे आवरण असते ते सबंध शरीरावर पायापर्यंत संक्रमित होऊन त्यांच्या बुद्धीतील तपस्या, साधना यांच्या उंचीने आपल्या जीवनाचे भलं होते.

आईची आदर्श पावले, ही आदर्श चरणांची चिन्हे आहेत.
प्राणात उमलते ती प्रार्थना. प्रार्थना ही देवाकडे जाते आणि देवाचा आशीर्वाद हा माणसापाशी येतो. त्यामुळे माणुसकीचा सत्कार करा.
श्यामची आई हे मंगलमय स्तोत्र आहे. श्यामवर तिने केलेले संस्कार महत्त्वाचे आहेत. तिने त्याला चांगल्या गोष्टी शिकविल्या. शिक्षणाने शब्दाबरोबर माणुसकी जपली जाते.

सत्काराच्या बाबतीत सांगताना कमलताई म्हणाल्या सत्कार करणारा व सत्कार करवून घेणारा यापेक्षा सत्कार पाहणारा हा मोठा असतो. दुसऱ्याच चांगलं बघणे, असे डोळे निर्माण होणे याहून कोणतीही गोष्ट मोठी नाही.

कशाला हसावं हेही प्रसंगानुरूप कळायला हवं.
विनम्रता, साधेपणा, माणुसकी, अंतरंगातुन ज्ञान उमलणे, सत्वगुण व तत्वांचे जागरण, मी खरा की खोटा, हे स्वतःला तपासून पाहणे. या सर्व गोष्टी शामच्या आईने वेगवेगळ्या गोष्टीतुन सांगितल्या.

केस कापणे – केसांचा मोह टाळणे म्हणजे धर्म पाळणे.
पोहणे- ऐल तीरावर उभे राहून पैलतीराचा अंदाज घेणे. पाण्यात सूर मारल्यावर सर्व जगाला पोटात मावतील एव्हढे विचारांचे मोती घेऊन वर येणे. याप्रमाणे जलक्रीडा करुन त्याचे जीवनक्रिडेत परावर्तित होऊन जीवनाचा अर्थ कळतो.
शाश्वत – अशाश्वत यांचे महत्त्व कावकाव व चिवचिव या गोष्टीतून सांगितले.
आईचं पोतं – जीवनाचा अनुभव समृद्ध करणारं म्हातारं व्यक्तीमत्व सोबत असलं पाहिजे.
मातृसंस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. हंड्याने पाणी भरणारी बाई सगळ्यांना पाणी देत देत रिकामी घागर घरी आणते त्याप्रमाणेच रिकामे होत होत आलेले जीवन आपल्याला चांगल्या कृतीने जगता आले पाहिजे. त्यात सुगंधाची लयलूट करावी.

खरं जीवन कुठे आहे ते शोधायला शिका.

जात्यावर दळणारी, सडा शिंपणारी, उंबरा ही संयम रेषा पाळुन चांगले वाईट विचार जपून ठेवणारी, जीवनात सप्तरंगांची रांगोळी काढणारी , गोवऱ्या थापणारी, अशाश्वतास देखणे रूप करण्याचे सामर्थ्य असणारी, मायलेकीचं नातं जपताना, सासरी मिळून मिसळून वागण्याचे सल्ले देणारी, आपल्या भावनांना कानवल्यांसारखी मुरड घालावी असे सांगणारी. जिवंतपणाच्या या कला घेऊन अंगणभर फिरणारी माऊली आज दिसत नाही.

आजच्या काळात भौतिक प्रगती खुप झाली आहे. मोबाईल, डिजिटल, ए इंटेलिजन्स यामुळे माणसाचे आवाज संपत चालले आहेत. माणसाला माणसाची लाज वाटते. शिक्षण असलेली पण दुबळी,कुचकामी ठरलेली माणसं वृद्धाश्रम, अनाथाश्रम निर्माण करत आहेत. संकुचित मने निर्माण झाली आहेत. रस्ते रुंद झालेत पण मने अरुंद झालीत. माणसांमध्ये साधना, कष्ट,समर्पण दिसत नाही. माणूस हरवत चालला आहे, त्याला शोधायला लागेल.

सत्याला मेकअपची गरज लागत नाही.
एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होऊन विभक्त कुटुंबे निर्माण होत आहेत. फ्लॅट संस्कृती असल्यामुळे मनातलं अंगण हरवले आहे. यांत्रिक पद्धतीने माणूस जगतोय. गरिबांचे दुःख समजून घेत नाही. जे नाही,ते आहे असे मानून यात शक्ती वापरत आहे आणि जे आहे ते स्वीकारत नाही. पण हे फार काळ चिरंतर टिकणारं नाही हेही तितकेच खरे आहे.

पैसा, प्रतिष्ठा,तत्वं ही मूल्ये पचावी लागतात. त्यात सहजता आणावी लागते तरच खरी मूल्ये जपली जातात.
देशातील आई मोठी आहे. शिवाजी महाराजांच्या माऊली जिजामाता यांनी शिवाजींना घडविले. त्यांना आकार दिला. मुक्तपणे नाम संकीर्तन करायचे असेल तर तलवार हातात धरली पाहिजे ही शिकवण दिली. ‘प्राण गेला तरी देश वाचला पाहिजे’ हे लालबहादूर शास्त्री व भगतसिंग यांच्या आईने सांगितले आहे.
अहिल्यादेवींनी मनावर दगड ठेवून स्वतःच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली देऊन जबरदस्त शिक्षा दिली होती.

असे मनाला भावलेले कितीतरी माऊलींचे विचार कायमच लक्षात रहातील.
कमलताईंनी, साने गुरुजींच्या लहान लहान गोष्टी सांगत, इंग्रजी सुभषितांचे मराठीत भाषांतर करुन अत्यंत प्रभावी असे अमृतानुभव उलगडून दाखविले.
आजच्या पिढीने मुलांना कसे घडवावे हे सहजपणे सुचित केले. संस्कृती आत्मज्ञान, संस्कृती जागरण, आईचे स्मरण या नोटवर कमलताईंनी व्याख्यानाची सांगता करुन वक्तृत्त्वाचा हा सुगंध आम्हां श्रोत्यांमध्ये पसरविला.

मराठा मंडळाचे आदरणीय अध्यक्ष श्री. रमेश शिर्के यांचे प्रास्ताविक नेहमीप्रमाणे श्रवणीय झाले. सहचिटणीस सौ.ऐश्वर्या ब्रीद यांनी केलेली कमलताईंची ओळख-निवेदन व श्री. दिगंबर राणे यांचे आभार समर्पक. श्री चाळके यांचा बटाटा वडा व चहा मस्त !
असं हे कमलताईंचे आगळं वेगळं सुंदर वक्तृत्व ऐकण्यास मिळाले याबद्दल मराठा मंडळ कार्यकारिणीस मनःपूर्वक धन्यवाद.

✍️सौ. प्राची सोमण