महिला आघाडीची मीरा रोड येथील श्री नित्यानंद आश्रम, या अनाथ मुले,आजारी व वृध्द लोकांचा सांभाळ करणाऱ्या आश्रमाला भेट.

*जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.* *निराधार आभाळाचा तोच भार साहे.*

या ओळींची प्रचिती श्री नित्यानंद आश्रम मीरा रोड येथे गेलेल्या मराठा मंडळाच्या महिला मंडळ ग्रुप मध्ये सामील झालेल्या प्रत्येकाला आलीच असणार.

मराठा मंडळ,मुलुंड च्या महिला मंडळाने शुक्रवार दि.१२/०१/२०२४ रोजी, मीरा रोड येथील श्री नित्यानंद आश्रम, या अनाथ मुले,आजारी व वृध्द लोकांचा सांभाळ करणाऱ्या आश्रमाला भेट दिली.

प्राचार्य श्री. रुपेश पाटील आणि त्यांच्या सहकारी श्रीमती सीमा काळे यांनी आश्रमाची माहिती सांगितली. तिथे राहणाऱ्या सर्वांची एकूण सामान्य आरोग्य स्थिती, अगतिकता, असहाय्यता असे अत्यंत विदारक चित्र होते. आजारी लोकांची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येत होते. रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत सापडलेल्या काही वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या आश्रमात आश्रय देण्यात आलेला आहे. तसेच पालक नसलेली अनेक मुले त्यांच्या देखरेखीखाली आहेत. सुंदर,निरागस अनाथ मुलं, ज्यांच्या डोळ्यात आनंदी स्वप्ने असायला हवीत तेथे उदासीनता दिसत होती.आणि यावेळी महिला मंडळाच्या मैत्रिणींनी उस्फुर्त प्रतिसादाने निधी दिला. वेळोवेळी त्यांची मदत होतेच.

खरोखर मन विचलित व विमानस्क करणारा असा एकूण तेथील माहोल होता. बस मध्ये वृद्धाश्रमाला भेट देणार म्हणून उत्साही व मनात कुतुहल असणारे सर्व तेथील वातावरण पाहून क्षणावर स्तब्ध झाले.

-बेवारस निराधार ज्येष्ठ नागरिक आश्रय स्थान
-वंचित निराधार महिला ,मुले यांना आश्रय व त्यांचे सक्षमीकरण

या उदात्त हेतूने उभारलेल्या या आश्रमाचे संचालक  प्राचार्य श्री रुपेश पाटील व त्यांचे सहकारी श्री शशिकांत पाटील व सौभाग्यवती सीमा काळे यांचे कौतुक करावे तितके थोडेच.

नवजात तान्हुल्या पासून वंचित निराधार महिला ,जेष्ठ नागरिक व लहान मुले यांचे संगोपन करण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या या त्रिमूर्तीचे खरोखर मनापासून कौतुक करतो.

तेथे फिरताना तेथील ११० च्या आसपास लोकांची देखभाल, त्यांचे जेवण खाण, राहायची व्यवस्था हे सर्व खरोखर शिवधनुष्य पेलण्यापलीकडचे आहे याची जाणीव प्रत्येक अभ्यागताला झाली असणार. अलीकडेच जन्मलेल्या एका तान्हुल्याला त्याच्या मनोरुग्ण (परीत्यक्ता) मातेच्या कुशीत पाहून काळीज पिळवटून गेले.

त्या बालकाचे पुढे कसे होणार ,त्याची मनोरुग्ण माता त्याचे कसे सांगोपन करणार या विचारांचा मनात काहूर उठला . त्या बालकाला आंघोळ घालण्यापासून त्या बाळाची सर्व जबाबदारी श्रीमती काळे या स्वतः व्यक्तीशा: पाहतात.

अत्यंत अपुऱ्या चार पाच स्टाफ सोबत व ज्या काही थोड्या थोडक्या सुविधा उपलब्ध आहेत व मिळणाऱ्या अर्थसहाय्याने आश्रमाची देखभाल प्राचार्य श्री रुपेश पाटील यांच्या देखरेखीखाली केली जाते. प्राचार्यांशी बोलताना या सर्व गोष्टींचा उलगडा झाला व त्यांच्या बद्दलचा व त्यांच्या सहकाऱ्या बद्दलचा आदर द्विगुणित झाला.

मंडळाच्या वतीने आश्रमाला धान्य स्वरूपात आणि पैशांच्या रुपात मदत देण्यात आली. राजश्री सावंत हिने आपल्या बॅके मार्फत १२०००/-चा चेक दिला. आम्हाला पाहताच ते सर्वजण खूप आनंदी आणि उत्साही झाले. त्यातील काहींनी आमच्याशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला.

मराठा मंडळ ,मुलुंड पूर्व येथील “आपण सारे गाऊया ” गानवृंदातील गायक कलाकार सौभाग्यवती श्रद्धा सुर्वे ,श्री विजय सुर्वे ,श्री हेमंत भोगले ,सौभाग्यवती करुणा सावंत व श्री श्यामसुंदर परब यांनी मराठा मंडळाच्या वतीने काही गाणी सादर करून त्यांना आनंदी ठेवण्याचा आणि त्यांच्या एकाकीपणावर मात करण्याचा प्रयत्न केला. तेथील पिडीतांच्या आयुष्यात काही प्रमाणात आनंद पेरण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्याला सर्व उपस्थितांनी फारच छान उस्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांच्या नैराश्यमय जीवनात आनंदाचे दोन क्षण पेरले गेले. आश्रमातील काही मुलांनी त्यांच्या गाण्याचे ,वक्तृत्वाचे पैलू सादर केले.

जवळपास सर्वांनीच टाळ्या वाजवून, गाऊन, संगीताच्या सुरांवर नाचण्याचा आनंद लुटला.ही गोष्ट त्यांच्यासाठी खरोखरच उत्साहवर्धक होती. निघताना आम्हाला खूप वाईट वाटत होतं आणि त्याचवेळी आनंदही वाटत होता, की त्यांच्या एकाकी जीवनात आम्ही त्यांना काही आनंदाचे क्षण देऊ शकलो.

गायकांच्या गाण्यावर उत्स्फूर्तपणे नृत्य करणाऱ्या राजापूरच्या नृत्यांगनीची करूण कहाणी विदारक व दर्दभरी होती .दादरच्या भोईवाडा पोलीस स्टेशन कडून तिला येथे भरती करण्यात आले होते. नृत्याचे अमिष दाखवून तिला मुंबईला आणण्यात आले व अमानुष अत्याचार ,छळ करून नराधमांनी तिचे जीवन उध्वस्त केले .आज ही 30-35 वर्षाची मुलगी अर्ध दृष्टीहीन व तिच्यावरील अमानुष छळ व अत्याचारामुळे काही प्रमाणात मनोरुग्ण झाली आहे .

प्रत्येक गाणे ती गायक -गायीके बरोबर गात होती व गाण्यानुसार नृत्य व पदन्यास करत होती ते पाहून डोळे अश्रूने नकळत डबडबले.

लोक म्हणतात देव दिसतो ❓

*हो, जेंव्हा प्राचार्य रुपेश पाटील मला त्या मुली बद्दल माहिती देत होते तेंव्हा ती मुलगी त्यांना ” हे माझे मोठे सर” म्हणून लहान मुला सारखी बिलगली त्याचक्षणी मला प्राचार्यांत देव दिसला. मी अनाथांचा नाथ पाहिला.*

सौ. विजया साटम वहिनी ,सौ. शुभदा परब यांनीही गाणी सादर करून आपल्या परीने उपस्थितांचे मनोरंजन करण्यास हातभार लावला .
श्रीरामाचे गाणे सादर केल्यावर सौ. शुभदा परब बोलल्या श्रीराम जसे दुष्टांचे निर्दलन करण्यासाठी व दुर्बुलांना वाचवण्यासाठी लढले तसेच प्राचार्य श्री. रुपेश पाटील आपल्या रक्षणासाठी आलेत त्यांना सहकार्य करा व आपले जीवन सुखी करा. असे आवाहन त्यांनी सर्व आश्रम वासीयांना केले.

मराठा मंडळ मुलुंडच्या, महिला मंडळाच्या वतीने जमलेल्या फंडातून फुल न् फुलाची पाकळी म्हणून आश्रमाला अन्नधान्य व थोडे आर्थिक सहकार्य करून मराठा मंडळ भगिनींनी समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याचे छोटे काम करून, आम्ही विषण्ण मनस्थितीत आश्रम सोडला.

हा वृद्धाश्रम भेट उपक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा मंडळ मुलुंड , पुर्व येथील ज्या ज्या मान्यवरांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत व सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या सर्व भगिनींचे पुन्हा मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
आश्रम सोडताना विषण्ण मनात कुठेतरी समाधानाचा व सुखाचा एक कवडसा होता *तो म्हणजे या पिडीत जीवांच्या आयुष्यात आपण आज काही आनंदाचे क्षण पेरु शकलो याचा.

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई तर्फे महिला आघाडी यांच्या मार्फत आणि पुढाकाराने उचललेले हे मदतीचं पाऊल खुप समाधानकारक ठरले. गायक मंडळींनाही त्यातला भाग होता आले, याचा त्यांना फार आनंद आणि समाधान वाटत आहे.

अशा केलेल्या मदतीचे गुणगान याकरता करायचे की आणखी अशा बऱ्याच संस्था, आश्रम आहेत ज्यांना मदतीची अपेक्षा आहे. समाजाचे आपण देणं लागतो.. हा विचार प्रत्येकाच्या मनात रुळला, रुजला तर कित्येकांचे भले होईल.. एक खरच असेल की जिवनात सत्कार्य करणाऱ्यांच्या पाठी ईश्वरी शक्तीचं बळ असते.. फळाची अपेक्षा न बाळगणाऱ्यांना भरभरुन मिळते.. यात शंका नाही.. जर मिळालेल्या आयुष्याचं छानपणे सोनं करायचं असेल तर अशाप्रकारच्या उत्तम उपक्रमात वेळोवेळी सर्वानी सहभागी व्हायला हवे.. खरं म्हणजे मराठा मंडळाच्या मार्फत अशाप्रकारची कार्य घडतच असतात.. त्यामुळे सहभागी सर्वांना आत्मिक समाधान मिळत आहे.

सौ.मनिषा साळवी महिला आघाडी निमंत्रक, सांस्कृतिक प्रमुख सौ.रश्मी राणे,सास्कृति समिती निमंत्रक सौ. करुणा सावंत ह्यांचे खूप आभार. आलेल्या सर्व गायक गायिका, सर्व सदस्य मैत्रिणींचे आभार, ह्या सर्वांसाठी आम्हाला मंडळाचे मा.अध्यक्ष श्री रमेशजी शिर्के, सेक्रेटरी अजयची खामकर, कार्याध्यक्ष महेशजी चव्हाण,उपाध्यक्ष मा.अरुणजी चव्हाण, मा श्री शिवाजी सावंत,सर्व पदाधिकारी,कार्यकारिणी सदस्य या सर्वांचा भक्कम पाठिंब्याच्या बळावर मराठा मंडळ महिला आघाडी असे उपक्रम राबवत असतात.

असा उपक्रम राबवून निराधारां बद्दल जनजागृती करण्याच्या त्यांच्या स्तुत्य कार्याला सलाम.

 

शब्दांकन : श्री शामसुंदर परब, सौ. माधुरी तळेकर आणि श्री. हेमंत भोगले.