मराठा मंडळ मुलुंड आणि मराठा बिझनेस फोरम (MBF) यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

मराठा मंडळ मुलुंड आणि मराठा बिझनेस फोरम (MBF) यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

‘मराठा माणूस उद्योजक व्हावा, त्याला व्यवसायात योग्य आणि कौशल्याधारित मार्गदर्शन मिळावे, तसेच “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या भावनेतून समाजाने प्रगती करावी,’ या उदात्त उद्देशाने आज मराठा मंडळ मुलुंड आणि मराठा बिझनेस फोरम (MBF) यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘मराठा बिझनेस फोरम’ म्हणजे नेमके काय? आणि ही संस्था मराठा मंडळाला व समाजाला प्रगतीसाठी कशी मदत करू शकते, यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.

​कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून मराठा बिझनेस फोरमचे (MBF) ऑल इंडिया अध्यक्ष श्री. अरुण पवार साहेब (माजी मुख्य आयकर आयुक्त), माजी अप्पर पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य श्री. मोरे साहेब, तसेच राजेंद्र घाग, राजेंद्र सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के, कार्यकारी अध्यक्ष महेश चव्हाण आणि सरचिटणीस अजय खामकर यांनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

​उद्योजकांचे अनुभव आणि ‘मराठा बिझनेस फोरम’चे महत्त्व
​कार्यक्रमप्रसंगी बोलताना मराठा मंडळाचे सरचिटणीस आणि उद्योजक श्री. अजय खामकर यांनी आपले व्यवसायातील खडतर अनुभव मांडले. २००० साली ‘अजय टेक्नॉलॉजीज’ची स्थापना करताना आलेली आर्थिक चणचण, कौटुंबिक पाठिंबा आणि कष्टाच्या जोरावर उभी केलेली २५ वर्षांची यशस्वी उद्योजकीय कारकीर्द त्यांनी उपस्थितांसमोर ठेवली. ते म्हणाले, ​”आजच्या काळात नवउद्योजकांच्या पाठीशी उभे राहायला ‘मराठा बिझनेस फोरम’सारखी खंबीर संघटना आणि मार्गदर्शक आहेत. आमच्या वेळी अशी कोणतीही व्यवस्था नव्हती.” ​खामकर यांनी मराठा मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांकडून मिळालेल्या खरेदी (Purchasing) आणि वाटाघाटीच्या (Bargaining Power) कौशल्यांचा त्यांच्या व्यवसायात कसा फायदा झाला, हे सांगून संस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ६ जून रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन तरुणांसाठी घेतलेला हा पुढाकार म्हणजे एक नव्या उद्योजकीय राज्याभिषेकाची मुहूर्तमेढच आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

​ *तंत्रज्ञानाचे आव्हान आणि भावी दिशा*
​मराठा मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. महेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात बदलत्या तंत्रज्ञानाचा वेध घेतला. ते म्हणाले,
​”आजच्या काळात नोकऱ्या मर्यादित होत चालल्या असून व्यवसाय आणि प्रोफेशनलिझमची गरज वाढत आहे. ‘Artificial Intelligence’ (AI) आणि ‘Chat GPT’ मुळे सेवा क्षेत्रात (Service Industry) मोठे बदल आणि मर्यादा येणार आहेत. अशा वेळी आपल्या समाजातील तरुणांनी आतापासूनच परिपक्व होणे गरजेचे आहे.” ​चव्हाण यांनी ‘मराठा मंडळ @ ५०’ (Maratha Mandal At 50) या संकल्पनेचा उल्लेख करत, संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडवण्याचे आणि समाजातून किमान एक तरी आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS) अधिकारी घडवण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. यासाठी त्यांनी मराठा बिझनेस फोरमच्या ‘मुंबई सबर्बन चॅप्टर’ची एक शाखा मुलुंड येथील मराठा मंडळाच्या आवारातून चालवण्याचे आवाहन फोरमला केले, ज्याला फोरमच्या वतीने पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले.

​”शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद निर्माण करा” : अरुण पवार
​कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आणि MBF चे ऑल इंडिया अध्यक्ष श्री. अरुण पवार साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात नवउद्योजकांना मोलाचा सल्ला दिला. आपल्या ३६ वर्षांच्या आयकर विभागातील सेवेचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, मी अनेक मोठ्या उद्योगपतींना शून्यातून विश्व निर्माण करताना जवळून पाहिले आहे.

​पवार साहेबांनी स्पष्ट केले की, ‘मराठा बिझनेस फोरम’ (MBF) ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून मराठा समाजातील व्यावसायिक आणि नवउद्योजकांना संघटित करून त्यांना सक्षम करण्याचे काम करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कर्ज व अनुदान योजना (जसे की CMEGP, PMEGP, PMFME) गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत. या सर्व योजनांची माहिती फोरमच्या माध्यमातून मोफत दिली जाते आणि कर्ज मंजूर होईपर्यंत नवउद्योजकांना पूर्ण तांत्रिक व कायदेशीर मदत केली जाते, अशी ग्वाही त्यांनी दिली.

​कार्यक्रमाचा समारोप :
​या चर्चासत्रामुळे मुलुंड आणि परिसरातील मराठा समाजातील तरुण आणि महिला नवउद्योजकांना व्यवसायाच्या नवीन संधी, शासकीय योजना आणि नेटवर्किंगचे महत्त्व समजण्यास मोठी मदत झाली. एकमेकांच्या सहकार्याने समाजाने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, याच संकल्पाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

​मराठा मंडळाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले, तर फोरमच्या वतीने आगामी काळात मुलुंड परिसरात तरुणांसाठी विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आणि उद्योजकीय लेक्चर्स आयोजित करण्याचे जाहीर करण्यात आले.