।। देह देवाचे मंदिर ।।

शब्दांकन ….
सौ.प्रमिला सावंत.
  
आपल्या उदार धर्मामधे देवाचे स्वरूप ठरवण्यास स्वातंत्र्य असतं. देव सगळ्या चराचरात असू शकतो .देव आकाशात आहे,देव पाषाणात आहे,दीनदुबळ्यात आहे, देव आपल्या ह्रदयात वसलेला आहे .आपल्या शरीराला पवित्र माणून त्याची देखभाल करणारे अभावाने आढळतात.परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे फक्त सांगण्या,ऐकण्यासाठी असते. जसं  “देह देवाचे मंदीर,आत आत्मा परमेश्वर । जशी ऊसात हो साखर ,तसा देहात हो ईश्वर।।। आपले संत तुकाराम महाराज म्हणतात आपले शरीर हे देवाचे मंदीर आहे.त्यात परमेश्वर आत्मा रूपाने वास करतो .पण जसं  ऊसाला माहित नसतं त्याच्या आत मधे गोड साखर असते तसंच आपलंही आहे .
.
आपल्या ह्रदयात बसलेल्या ईश्वराला विसरून त्याच्या देवालयाची हेळसांड करून त्याला सगळी कडे शोधत असतो, पण देवालयाचे उंबरठे झिजवून देव शोधण्या पेक्षा आपण आपल्या ह्रदयातील ईश्वराकडे ध्यान वळवून पूजा नाही पण देखभाल करणे, ही माझ्या मते खरी भक्ती आहे. प्रत्येक प्राणिमात्रात जर देव आहे हे मानलं तर प्रत्येक शरीर हे देवालय आहे .पण आपल्या शरीराला आपण त्रास देऊन त्याची योग्य निगा राखत नाही. आता हेच बघा ना ,आपण उपवास करतो, का तर आपल्या धर्मात , शास्त्रात सांगितले म्हणून. पण उपवास म्हणजे काय तर देवा जवळ वास करणे (राहणे ) पण आपण किती आचरणात आणतो ?आयुर्वेदात उपवासाला महत्व दिलेले आहे.ठराविक अंतराने आपल्या पचन संस्थेला विश्रांती देण्या साठी,पण ज्या तऱ्हेने आपण उपवास करतो त्यात पचन संस्थेवर अधिकच ताण पडतो.दिवसभर उपवास करायचा आणि सोडताना भरपेट खायचे हे शरीर शास्त्राच्या विरोधात आहे .कांही जण आठवड्यातून तीन चार दिवस उपवास करतात.त्या दिवशी औषध सुध्दा घेणं टाळतात.मला वाटतं परमेश्वरा ने हे सुंदर शरीर आपल्या दिलेलं आहे त्याला क्लेश देऊन केलेल्या उपवासामुळे तो प्रसन्न होऊ शकणार नाही.जर परमेश्वर एकच आहे,तर वेगवेगळ्या देवांच्या नावाने वेगवेगळे उपवास कशासाठी ?      .                                                              
आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी आपल्याला अभंगांच्या रूपाने महान अशी शिकवण दिली.आसपास असलेल्या गोष्टींमधून तुकोबा महाराजांनी उदाहरणं देऊन उपदेश केला.पण आज आपल्याला या गोष्टींचा विसर पडला आहे .आजकाल तरूण पीढी तासनतास मंदिरांसमोर रांगा लावून उभे असतात.खरंच त्याच्यांठायी भाव असतो का? की फक्त मागण्यां साठीच .  मंदिरात नक्की जावं,तीथे गेल्यावर आपण नतमस्तक होतो .त्या मुळे आपल्याला वाकायची सवय लागते .ताठरपणा कमी होतो.मानसिकआधार मिळतो.पण आजकाल देव आणि देवालय यांचे बाजरीकरण झाले आहे .कांही मंदिरात कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते,देवाला सोन्याच्या मखरात बसविले जाते,देवाला सोन्याने मढविले जाते .तीथे जाऊन आपण काय पाहतो?
.
बदलत चाललेले देवाचे रूप.भक्ती परंपरेतील अनेक संतानी खऱ्या भक्ती कडे जाण्याचा मार्ग सांगितला आहे ,देव हा मंदिरात नाही तर तो आपल्या सर्वांत आहे.योग्य तो आहार,विहार,विचार आचरणात आणून व्यसनांपासून दूर राहून, शरीराची निगा राखून,आपल्या कुटुंबासाठी, समाज आणि देशा साठी चांगल्या गोष्टी करू शकलो तर मला खात्री आहे तो परमात्मा म्हणेल “बाबारे तुझे जीवन सार्थकी लागले!!” .


Leave a Reply