– सहल – एक स्वप्नपूर्ती-

दुर्गा पंचमी टूर्सचे प्रमुख श्री. अभय कुलकर्णी यांना फोन केल्यावर वाराणसी, अयोध्या दूरचे समजले. तेव्हापासून मनात घोळू लागले, आपल्याला ही सहल जमेल का ? पण श्री.अभय यांची सहल म्हटल्यावर मनाचा हिय्या करुन जायचा निर्णय घेतला.
.
दिः ३ मार्च २०२५ ते ७ मार्च २०२५ आमची सहल होती. सहलीच्या २-३ महिने आधीच विमानाची तिकीटे बुक करणे हे महत्त्वाचे काम आमच्या प्रमुखांनी केलेच होते. तेव्हापासून आम्हाला ३ मार्चचे वेध लागले होते. शेवटी तो शुभदिन उजाडला.सकाळी ८.३० वाजताच मुंबई विमानतळावर पोहोचलो. श्री. अभय उभयंता सर्वांसाठी गरम गरम नाष्टा (पोटपूजेची तयारी) घेऊन आलेच होते. ११.२० चे विमान सुटण्यापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करून ‘वाराणसी’कडे प्रयाण केले. विमान थोडे विलंबाने धावल्याने २ वाजता वाराणसी विमानतळावर पोहोचलो. वाटेत छान जेवण करून हॉटेल ‘कोस्टा रिव्हर’ वर आलो. लगेच ५ वाजता ‘वाराणसी घाट’बघण्यास निघालो.’नमो घाटावरून’फिरण्यास सुरुवात केली.संध्याकाळची वेळ असल्यामुळे छान गार हवा आणि संथ पाण्यातून चालणारी होडी यामुळे जलप्रवासाची मजा काही औरच ! सर्व घाट बघत बघत ‘अस्सी घाटावर’ शेवट केला. तेथे गंगा आरतीसाठी थांबलो. प्रचंड गर्दी होती. आरती बघून गंगेत दिवे सोडले. मन अतिशय प्रफुल्लीत झाले.
.
दिः ४ मार्चला सकाळी लवकर उठून ६ वाजताच हिंदूंचे प्राचीन काळापासूनचे श्रद्‌धास्थान ‘काशी विश्वनाथ’ मंदिराकडे प्रयाण केले. हे मंदिर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक. प्रचंड गर्दी होती. खास रांगेतून आम्ही शिवलिंगाचे दर्शन घेतले. जवळच अन्नपूर्णा मंदिर, हनुमान मंदिर, काळभैरव मंदिर बधून नंतर हॉटेलवर येऊन नाष्टा घेतला. थोडा आराम झाल्यावर, दुपारचे जेवण करून ‘सारनाथकडे’ प्रयाण केले. हे बुद्ध मंदिर आहे. परिसर प्रचंड आहे. ५ बौद्ध भिक्षूंना येथे दीक्षा दिली. येथील विस्तीर्ण भूभागावर असलेले भव्य स्तूप पाहून मन भारावून गेले. वैशिष्ट्यपूर्ण असे म्युझियम,भव्य अशी अशोक चक्राची प्रतिकृती आणि इतर विविध शिल्पे पाहिली.
.
जवळच असलेली भगवान बुद्‌धाची ८० फूट उंचीची उभी मूर्ती,हे इथले खास आकर्षण आहे. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता ‘मानस मंदिर’ कडे प्रयाण केले. वाराणसीतील प्रसिध्द मंदिरापैकी एक आहे. प्राचीन हिंदू महाकाव्य ‘रामचरितमानस’ हे १६ व्या शतकात हिंदु कवी तुलसीदास यांनी या ठिकाणी लिहीले. त्यामुळे मंदिराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. छोट्या छोट्या दालनात रामायणातील काही प्रमुख प्रसंग हलणा-या मूर्तींमधून बघायला छान वाटले. येथील इमारतीच्या भिंतींवर‌सुद्धा संपूर्ण रामायण सुबक अक्षरांत कोरलेले आहे. खूपच अप्रतिम. पाहून मन भरून आले. 
.
दिः ५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता नाष्टा करून ‘प्रयागराजकडे’ प्रयाण केले. दुपारी १२ वा. सर्वप्रथम ‘बडे हनुमान मंदिर’ दर्शन घेतले. येथेही भरपूर गर्दी होती. त्यामुळे दर्शनासाठी पैसे देऊन खास रांगेतून दर्शन झाले. हनुमान झोपलेल्या अवस्थेत आहे. अशी आख्यायिका आहे की, हनुमान श्रीलंकेतून दमून आले आणि गंगेच्या काठी विश्रांती घेण्यासाठी पहुडले. हे सर्व बघून प्रयागराजला हॉटेल ‘विठ्ठलवर’ १.४५ ला पोहोचलो. छान साग्रसंगीत जेवण करून ३.३० वाजता स्वर्गीय मोतीलाल नेहरूंचे भव्य निवासस्थान “आनंद‌भवन” आणि स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे ‘स्वराजभवन’ येथे भेट दिली. दोन्ही ठिकाणी मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचा जीवनपट फोटो रुपाने साकारलेला आहे. त्यांनी वापरलेल्या वस्तू बघायला मिळाल्या. ही दोन्ही ठिकाणे जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांची जन्मस्थाने आहेत. संध्याकाळी हॉटेलवर परत येऊन रात्री लवकर जेऊन आराम केला. सकाळी लवकर उठून संगमावर जायचे होते ना !
.
दि. ६मार्च रोजी ६.३० वाजता गंगा, यमुना आणि सरस्वती (लुप्त झालेली) या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पोहोचलो. काहींनी गुडघाभर पाण्यात डुबकी मारली, तर काहींनी फक्त पाय पाण्यात बुडवून आणि मस्तकावर पवित्र जल शिंपडून घेतले. आजूबाजूचा प्रचंड परिसर, उभारलेले तंबू, सर्वत्र असलेली प्रकाश योजना हे सर्व बघून कुंभमेळ्याच्या भव्यदिव्यतेची कल्पना आली. त्यानंतर ८.१५ वाजता हॉटेलवर येऊन सर्व आटोपून नाष्टा करुन १० वाजता अयोध्येकडे प्रयाण केले. दु.२ वाजता हॉटेल ‘राज पॅलेस’ वर पोहोचलो.जेवण उरकून ३ वाजता ज्याच्या दर्शनाची खूप आतुरता होती त्या  ‘श्रीराम मंदिराच्या’ दर्शनासाठी गेलो. भव्य परिसर, अप्रतिम मंदिर, नक्षीदार  कोरीव काम हे सर्व बघून ऊर भरून आला. पद्धतशीरपणा, जेष्ठांसाठी खास व्हील चेअरने खास रांगेतून दर्शनाची केलेली सोय हे सर्व पाहून समाधान झाले. धन्य धन्य पावले. बहुप्रतिक्षित उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले. नंतर हनुमान गढी व शरयू नदीचे दर्शन करुन हॉटेलवर आलो.
.
दि.७ मार्च रोजी सकाळी नाष्टा करून १० वा. ‘लखनौकडे’ प्रयाण. रस्त्यात एका छानशा हॉटेलमध्ये जेवण केले. ट्रीपमध्ये वाढदिवस साजरा करणे हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम. इथेही शितल कुलकर्णी वहिनींचा केक कापून वाढदिवस साजरा केला. नंतर लखनौमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल पार्क’ येथे भेट दिली. सर्वत्र असंख्य हत्तींच्या मूर्ती पाहिल्या.याचे बांधकाम मायावतींच्या काळात झालेले आहे. परिसर खूपच प्रशस्त ! त्यानंतर जवळच ‘इमाम बडा मशीद’ येथे ओझरती भेट दिली. आतमध्ये भुलभुलैय्या आहे. परंतु वेळेअभावी आम्ही पाहिले नाही. नंतर थोडा वेळ घाईघाईत खरेदी आटोपून लखनौ विमानतळावर पोहोचलो. वाटेत सर्वांसाठी जेवणाची पार्सल घेऊन श्री. अभय यांनी सर्वांच्या पोटाची काळजी घेतली होती. विमानतळावरच जेवण उरकून रात्री १०.२० च्या विमानाने मुंबईत आगमन झाले.
.
एकंदरीत सर्वांनी सहलीचा मनापासून आनंद लुटला. श्री. अभय कुलकर्णी व सौ. वंदिता वहिनी यांच्या मनमोकळ्या, खेळकर स्वभावामुळे सहलीत कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. बस प्रवासात गाणी, अंताक्षरी झाली. श्री. अभय यांचे त्यांच्या खास शैलीतील विनोदी किस्से ऐकून सहलीला अधिकच रंगत आली हं ! राहण्याची उत्तम सोय, रोजचा विविध प्रकारचा नाष्टा,जेवणातील विविधता खूपच मजा देवून गेली.
.
शेवटी सांगावेसे वाटते,आमचे अयोध्या,वाराणसीचे स्वप्न केवळ आणि केवळ ‘दूर्गा पंचमी टूर्स’ मुळेच साध्य झाले.
.
धन्यवाद !
.
सौ. प्राची पालव. मुलुंड


Leave a Reply