*मामांच्या प्रामाणिकपणाला सलाम*

साधारण २०२२ सालची गोष्ट असेल. मुलुंडच्या मराठा मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त “रम्य दिवाळी पहाट” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यादिवशी पहाटेच ६.३० वाजता श्रवणीय मराठी गीतांचा कार्यक्रम होता.मी पहाटेच मंडळात गेलो.व त्या दिवशी दीपावली पाडवा असल्यामुळे नवे कपडे परिधान करण्याबरोबरच सोन्याची अंगठी,चेन व ब्रेसलेट घालुन मंडळात गेलो.कार्यक्रम ठिक ६.४० वाजता चालु झाला.व्यासपीठा समोरील आसनावर आसनस्थ झालो. कार्यक्रम रंगत चालला होता.दिड दोन तासाने मध्यंतर झाला,चहा घेत होतो, तेव्हढ्यात माझे मनगटावर लक्ष गेले तर हातात ब्रेसलेट नव्हते.चहा तसाच ठेवला व ज्या आसनावर बसलो होतो तिथे गेलो, पहातो तर ब्रेसलेट नव्हते. आसनाखाली वाकुन बघितले पण ब्रेसलेट सापडले नाही.

थोड्याच वेळात पुन्हा कार्यक्रम चालु झाला पण त्यात माझे लक्ष लागेना.मी ही गोष्ट माझे सहकारी प्रमोद देसाई व राजन भोसले यांना सांगितली.कार्यक्रम ठिक १० वाजता संपला.थोड्याच वेळात सभागृह रिकामे झाले व सर्व मंडळी मुख्य सभागृहातुन तळमजल्यावर आले, तिथे अल्पोपहाराची मंडळातर्फे सोय केली होती. दरम्यान सभागृह रिकामे होताच मंडळाच्या सेवक वर्गाने साफसफाईला सुरुवात केली होती. साफसफाई करत असताना आमचे एक सेवक परब मामा (सहदेव परब)यांना मी जिथे बसलो होतो तिथेच खाली पडलेले ब्रेसलेट सापडले त्यानी मला बघितले होते त्या आसनावर बसलेले, ते धावतच तळमजल्यावर आले व मला बघताच बोलले हे तुमचे ब्रेसलेट का? कारण तुम्ही बसला होतात तिथेच खाली सापडले आहे व ब्रेसलेट पहाताच माझा आनंद गगनात मावेना व आईची आठवणही आली.

कारण मी ब्रेसलेट वापरावे ही आईची फार इच्छा होती,व तिची इच्छा माझा मुलगा अनिकेतने पुर्ण केली होती व त्याने मला ब्रेसलेट गिफ्ट दिले होते.तिच्या इच्छेखातर मी ब्रेसलेट सणासुदीला आठवणीने वापरत असे.परब मामा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आमच्या मंडळाचे अध्यक्ष मा.रमेश शिर्के यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.व माझे ब्रेसलेट सापडल्यामुळे माझा दीपावली पाडवाही अवीट गोडीचा ठरला.परब मामांच्या प्रामाणिकपणाला सलाम!

अरुण विठ्ठल चव्हाण,
मुलुंड (पश्चिम).

*महाराष्ट्र टाइम्स* वृत्तपत्राच्या पुरवणीत माझा हा लेख सोमवार दि.१६ जुन २०२५ रोजी प्रसिद्ध झाला आहे.



Leave a Reply