- June 19, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माझी मुलगी पहिली/दुसरीत असेल. तिला दिवाळीची सुट्टी २-३ दिवस आधी लागलेली. शाळेच्या दिवाळी प्रकल्पात तिला एक कंदील तयार करायचा होता. मी ठरवलं,आधी वर्तमानपत्राचा एक छोटासा नमुना कंदील तयार करून पाहूया म्हणून छोटासा कंदील तयार केला. त्यात लाईट लावल्यावर कसा दिसेल हे तिला दाखवण्यासाठी, मी सोफ्यावर चढून, भिंतीवर असलेल्या मोठ्या बल्बला तो अडकवला आणि बल्ब लावून दाखवला … *”बघ सोना, किती छान चमकतोय!”*
कंदील तसाच बल्बला अडकवून ठेवून मी किचन मध्ये जेवण वाढायला गेले. हातात ताट घेतलं. भात वाढला, त्यावर वरण घालतच होते, इतक्यात साक्षी घाबरून, धावत ओरडत आली, “आयडू! बघ आग लागली, आग लागली !” हातातलं ताट तसंच घेऊन, मी धावत बाहेर आले… पाहते तर, वर्तमानपत्राचा तो कंदील पूर्णपणे पेटला होता आणि तो आता खाली पडणारच होता……क्षणाचाही विलंब न करता मी पटकन सोफ्यावर चढले आणि हातातलं जेवणाचं ताट खाली धरलं.
पेटलेला कंदील थेट ताटात पडला! बल्बच्या उष्णतेमुळे कंदिलाने पेट घेतला होता. जर तो थेट खाली असलेल्या सोफ्यावर पडला असता तर…? काय झालं असतं याची कल्पना देखील नकोशी वाटते. आम्ही दोघीही त्या वेळी जर किचनमध्येच असतो, तर बाहेर काय प्रकार घडला असता याचा विचार करून आजही अंगावर काटा येतो. पाठीशी उभे स्वामी आणि प्रसंगावधान!
आजही ही घटना डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते.
*एक छोटासा निष्काळजीपणा किती मोठा धोका ठरू शकतो, हे तीव्रतेने जाणवले. सावधगिरी आणि जागरूकतेचा धडा आयुष्यभर पुरेल इतका खोलवर मनात कोरला गेला.*
ऐश्वर्या ब्रीद
