- June 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
.
९-१० वर्षांची असेन तेव्हाची आठवण. आमच्या बिल्डिंग मधील शिंदे काकींनी आपल्या गॅलरीत हौशीने २-३ कोंबड्या पाळल्या होत्या. मोठ्या गॅलऱ्या असल्यामुळे ते शक्यही झालं होतं.
.
रोज सकाळी त्या कोंबड्यांना खाली सोडायच्या आणि संध्याकाळी त्या परत पकडून घरी आणायच्या. संध्याकाळची वेळ म्हणजे आम्हा लहान मुलांची खेळायची वेळ. बिल्डिंगच्या तळमजल्यावरील पॅसेजमध्ये आम्ही लहान मुले लंगडी,पकडापकडी,खांब खांब,थप्पी थप्पी अशा धमाल खेळांमध्ये गुंग असायचो. त्याचवेळी शिंदे काकी कोंबड्या पकडायला खाली यायच्या.
.
एका संध्याकाळी असेच आम्ही लंगडीमध्ये गुंतलेलो होतो. एवढ्यात कोंबड्या पकडण्यासाठी काकी आल्या आणि माझे सगळे मित्र-मैत्रिणी खेळ सोडून कोंबड्या पकडायला धावत गेले. २ दिवसांपूर्वीच ५ व्या मजल्यावरून पडलेली एक कुंडी ट्यूबलाईटवर आपटून – ती ट्यूबलाईट फुटली होती. तिच्या काचा अजूनही तशाच पडलेल्या होत्या. मी सर्वांना काळजीने ओरडून सांगत होते की त्या बाजूला जाऊ नका, तिथे काचा आहेत. पायात चप्पल घाला! पण नंतर उत्साहाच्या भरात मीच त्यांच्या मागे चप्पल न घालता कोंबडी पकडण्यासाठी धावत गेले आणि त्या ट्यूबलाईटची एक काच माझ्या पायात रुतली. ती कशीबशी काढली. जवळच्या नळावर जखम धुतली. थोड्यावेळाने रक्त थांबलं. पण घरी गेल्यावर आईचा ओरडा मिळेल या भीतीने मी घरी काहीच सांगितलं नाही. पाय दुखत होता पण तरी पाय जमिनीवर दाबून दाबून, चेहऱ्यावर अजिबात वेदना न दाखवता मी घरात तशीच चालायचे.
.
नंतर साधारण ४- ५ दिवसांनी शाळेची सहल होती – लोणावळा, खंडाळा आणि कार्ला लेणी. पाय दुखत असतानाही मी सहलीला गेले. कार्ला देवीच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर माझा पाय सुजला, जोरात दुखू लागला, डोळ्यापुढे अंधारी यायला लागली, ताप भरला. रात्री घरी परतताना सुजलेल्या पायात चप्पल घालता आली नाही. चप्पल हातात घेतली आणि लंगडत खाली उतरले. आई घ्यायला आली होती.
.
“काय झालं गं?” तिच्या या प्रश्नावर मी अखेर सत्य सांगितलं. आईने चिडून मला अक्षरशः फरफटत घरी आणलं. दुसऱ्या दिवशी ती मला म्युनिसिपाल्टी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले, “काच आतमध्ये आहे. खोल रुतली आहे.” पायावर स्पिरिट की काय ओतून, छोटसं ऑपरेशन करून त्यांनी जवळपास पाच पैशाच्या नाण्याएवढी काच बाहेर काढली. मी वेदनेने ओरडत होते.रडत होते.डॉक्टरांनी चिमट्यात पकडलेली ती काच आईला दाखवत म्हटलं, “तुमच्या मुलीने बघा ही काच इतके दिवस पायात कशी सांभाळून ठेवली होती!” पुढे म्हणाले “ट्यूबलाईटच्या काचेला आतून जी पांढरी पावडर असते, ती विषारी असते. नशीब समजा, ते विष आत खोलवर गेलं नाही. तसं झालं असतं तर आज पाय……” बाप रे….!!
.
त्यानंतर जवळपास महिनाभर औषधे सुरू होती. दररोज शाळेच्या मधल्या सुट्टीत हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करून घ्यायला जायचे. ड्रेसिंग करताना दुखायचं, मी रडायचे- ओरडायचे, तर नर्स रागवायची, “इतकी मोठी झालीस, ओरडतेस काय, तोंड एकदम बंद.” अस्सा राग यायचा ना मला तिचा
जखम बरी होईपर्यंत जवळपास एक महिना गेला. या सगळ्या अनुभवातून एक धडा मिळाला, की धाडस दाखवणं एक वेळ ठीक. पण लपवून ठेवणं म्हणजे मुर्खपणा. वेदना दाबणं सोपं असतं पण त्याला सामोरे जाणं हेच खरं धाडस. आज एवढे मोठे झाल्यावर कळतंय की शरीराला झालेल्या जखमा असोत की मनाला बसलेले ओरखडे. त्यांचं ड्रेसिंग वेळेवर आणि योग्य माणसांसोबत बोलून करणं गरजेचं असतं. कुटुंबीय,मित्र,शिक्षक वा स्वतःशी – कोणासमोरही मन मोकळं करणं, हीच तर खरी जखम भरून काढणारी औषधं आहेत.
.
अशाच एका दुसऱ्या लपवालपवीच्या गोष्टीतून पुन्हा एकदा धडा मिळाला. ती गोष्ट पुढील आठवणीत…
.
ऐश्वर्या ब्रीद.
