- February 24, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
गुरूवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी आपल्या मराठा मंडळात आयोजित शिवजयंती उत्सव हा कार्यक्रम खरोखरच अप्रतिम!! एखाद्या व्याख्यात्याचे व्याख्यानऐकताना *मंत्रमुग्ध होणे*म्हणजे काय? याचा साक्षात अनुभव उपस्थित रसिक प़ेक्षकानी घेतला!!
डॉ. संग्राम इंदोरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत *शिवरायांसी आठवावे…*या विषयावर प़ेक्षकाना अक्षरश: खिळवून ठेवले! मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर भालेराव यांच्या माध्यमातून त्यांचेच नातेवाईक असलेल्या डॉ. संग्राम इंदोरे यांना ऐकण्याची सुवर्ण संधी उपस्थितांना लाभली! त्यांचे अफाट पाठांतर, विषयाचा गाढा अभ्यास, भाषेवरील प़भुत्व सारेच अप्रतिम!!
आपल्या ओघवत्या आणि सहज भाषेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे जिवंत चित्र उभे केले. कवी भूषण, अमात्य यांचे छंद तसेच फारसी भाषेतील मुघलकालीन संवाद यांच्या माध्यमातून त्यांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे आणि प्रभावी पाठांतरामुळे व्याख्यान अत्यंत प्रभावशाली ठरले.
या कार्यक्रमाच्या प़ारंभी सुप्रसिद्ध शाहीर मधुकर खामकर यांनी आपल्या पहाडी आवाजात सादर केलेले महाराष्ट्र गीत आणिछत्रपतींच्या जीवनावरील खड्या आवाजात साभिनय गायलेला पोवाडा अंगावर रोमांच उभा करणारा होता!! त्याना साथ देणारा मंडळाच्या कलाकारांचा कोरस सुद्धां तितकाच दमदार!!
शाहीर मधुकर खामकर यांनी सादर केलेले महाराष्ट्र राज्य गीत आणि दणदणीत पोवाडा कार्यक्रमाची उंची वाढवणारे होते. वयाच्या ७५व्या वर्षीही त्यांनी दाखवलेली ऊर्जा आणि कणखर आवाज सर्वांसाठी प्रेरणादायी होते. मंडळातील कलाकारांनी दिलेली उत्कृष्ट साथ कार्यक्रमात रंगत आणणारी ठरली. छोट्या साईश मोरे याने दिलेली महाराजांची बुलंद ललकारीही तितकीच प्रभावी ठरली.
मंडळाच्या महिला भगिनींनी सादर केलेला शिवरायांचा पाळणा अत्यंत भावस्पर्शी ठरला. सौ. करूणा सावंत आणि सहकारी कलाकार महिला भगिनींनी सादर केलेला महाराजांचा पाळणा सुद्धां फारच श्रवणीय होता! मंडळाच्या गेल्या कौटुंबिक सहलीमध्ये सापडलेला एक लखलखता *हीरा* म्हणजे कुमार साईश मोरे यांने दिलेली ललकारी सभागृहात घुमली !! सर्वानीच कु. साईश याचे कौतुक केले! संपूर्ण कार्यक्रमाचे रसाळसूत्रसंचालन सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी खूपच छान केले.
शेवटी सहचिटणीस श्री. दिगंबर राणे यांनी यथोचित शब्दात रसिक प़ेक्षकांचेआभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे एकूण आयोजन / नियोजन करण्यात सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. रश्मी राणे, निमंत्रक मनिषा साळवी, सौ. करुणा सावंत, सौ. ऐश्वर्या ब्रीद आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला, कलाकार मंडळाचे सरचिटणीस श्री. अजय खामकर,सर्व पदाधिकारी, कार्यालयीन स्टाफ, अन्य सर्व कामगार/ कर्मचारी श्री लक्ष्मी कॅटरर्सच्या सौ. शामल चाळके व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचेचबहुमोल योगदान या आयोजनामध्ये लाभले होते ! मंडळाचे कार्यकारी मंडळ विविध समित्या, कलाकार या सर्वांचे परस्पर सहकार्य / सहभाग यामुळे मंडळाचे सर्वच कार्यक्रम अगदी चढत्या क्रमाने यशस्वी होत असतात त्याचाच प़त्यय याही वेळी आला!
