रिमझिम कवितांची ……………!
.
काल २६ जुलै २०२५, रोजी संध्याकाळी बाहेर पाऊस बरसत होता आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई इथे सरस्वती वाचनालय आयोजित “कवितांची रिमझिम” आपल्याला चिंब भिजवत होती. अनंत जोशी, सुप्रिया हळबे, सतीश सोलांकुरकर, साहेबराव ठाणगे असे कवी, कवयित्री त्यात सामील झाले होते.
.
अनंत जोशी हे बँक ऑफ महाराष्ट्र मधून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीनंतर त्यांनी कविता लिहिणे सुरू केलं. त्यांचा एक कवितासंग्रह “मावळतीच शहाणपण ” ही नुकताच प्रकाशित झाला आहे सुप्रिया हळबे यांनी तर प्रशांत दामले यांच्या “गेला माधव कुणीकडे” या नाटकाचे शंभर प्रयोग केलेले आहेत. “एबीपी माझा ” मधील कार्यक्रमात त्या सहभागी झालेल्या आहेत.
.
सतीश सोलांकूरकर हे बीएआरसी मधून निवृत्त झाले आहेत, कवी आहेत आणि त्यांनी काल निवेदनाची जबाबदारी सांभाळली होती . त्यांचेही दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.चौथे कवी साहेबराव ठाणगे हे पारनेर मधून आलेले आहेत. ते म्हणतात फक्त 22 वर्ष गावात आणि उरलेली 55 वर्ष इकडे शहरातच काढली आहेत तरीही गावच्या मातीचा गंध काही विसरला जात नाही. त्यांचा ही एक कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.
.
प्रत्येकाने पाच-सहा कविता सादर केल्या, त्यात भर पावसाच्या कवितांवरच होता. सुप्रिया हळबे म्हणतात
.
“माझ्या मनात पाऊस
लाजे गुलाबी पाऊस
डोळा भेट होता रुजे
माझ्या देहात पाऊस”
.
अनंत जोशी म्हणतात
“किती आठवणी देतो
तो पहिला पाऊस
डोंगरदऱ्यात करीत भ्रमंती
झेलीला पहिला पाऊस”
.
साहेबराव ठाणगे म्हणतात
“नव्या नकली जमान्यात
पाऊस तेवढा खरा आहे
माती मधल्या माणसांना
आभाळाचा तोरा आहे”
.
तर सतीश सोलांकुरकर म्हणतात
“गणिताच्या तासाला मग
छडी होऊन वाजायचा
ओशाळवाणा होऊन कधी
वळचणीला दडायचा”.
.
बाहेर पाऊस, सभागृह भरलेले आणि लोकांची रसिक दाद यामुळे खुलून जाऊन कवी पावसावरच्या रोमँटिक कविता ऐकवण्यात मशगुल झाले होते.
सुप्रिया हळबे या गझलकारही आहेत त्यांनी एक सुंदर, रोमँटिक पावसावरची गझल ऐकवली.
.
तू नसल्यावर
.
“तू नसल्यावर बोलत असते मुकी डायरी शब्दांमधले मुक वाहणे ‘म्हणजे पाऊस’
उरात धडधड झरती डोळे अशक्य हूरहूर आठवणींना रोज वेचणे ‘म्हणजे पाऊस’
कॉफी, गप्पा, गझला, कविता, आपण दोघे दोघांमधले अंतर मिटणे ‘म्हणजे पाऊस’
हातामधे हात तुझा, श्वासांची फुगडी किती ते डोळ्यातून बोलणे ‘म्हणजे पाऊस’
थेंब टपोरा ओठांवरती बघ ओघळला मनातले थेंबाला कळणे ‘म्हणजे पाऊस'”
.
साहेबराव ठाणगे म्हणतात
“पाऊस पहाटेचा अलगद कानावर
हळुवार मनावर गोड गुलाबी मिठीत
झुंजूमुंजू भानावर पाऊस सकाळचा
धुक्यात चुरगळलेला दवात विरघळलेला
पूर्वेकडील प्रकाशाच्या प्रेमात बारगळलेला”
.
तर दुसऱ्या कवितेत साहेबराव म्हणतात
“तुझा माझा पाऊस शहाणा असून वेडा होतो
तुझा माझा पाऊस तुझ्या माझ्यातच थांबलेला
देता देता घेता घेता पहाटेपर्यंत लांबलेला”
.
अनंत जोशी त्यांच्या एका कवितेत म्हणतात
“पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्त नक्की करेल
स्वर्गात नाही तर नरकात कुठेतरी नक्की धाडेल
ठेवून जसं नाही जायचं तसं घेऊनही नाही जायचं
कर्ज एक रुपयाचा सुद्धा नावावर नक्की नाही ठेवायचं”
.
किती खरं आहे नाही का !
.
अशाच कितीतरी कवितेच्या सरीवर सरी कोसळत होत्या आणि घड्याळाचे भान न ठेवता सभागृहातले रसिक त्यात चिंब चिंब भिजत होते.
.
प्रज्ञा पावगी
२७ जुलै २०२५





