- February 16, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी आपल्या मंडळाच्या वाचनालय आणि अभ्यासिका समितीच्या विद्यमाने आयोजित *मुक्त अभिवाचन आणि निबंध स्पर्धा विजेत्यांचा बक्षीस समारंभ* हा कार्यक्रम मंडळाच्या परंपरेला साजेसा व उत्तम प्रकारे पार पडला! कार्यक्रमाचे एकूण आयोजन/ नियोजन फारच छान होते. निबंध लेखन स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पार पडली होती. निबंध लेखन सहभागींना सखोल चिंतन, विचार आणि नेमकी मांडणी करण्यास वाव मिळाला.
कार्यक्रमाच्या निवेदनापासून आभार प़दर्शनापर्यंत अगदी शिस्तबद्ध सादरीकरण करण्यात आले होते! या समारंभाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ शिक्षिका आणि निवेदिका सौ. वैशाली सरवणकर यांचे समयोचित मार्गदर्शन केवळ विद्यार्थी किंवा स्पर्धकांसाठीच नव्हे तरकार्यकर्ते व नागरिकांसाठी सुद्धां अत्यंत उद्बोधक असेच होते. वाचनालय समितीचे सर्व सदस्य, कार्यकारिणी, विविध समित्यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच कार्यालयीन स्टाफ या सर्वांच्या परस्पर समन्वयाने नेहमी प्रमाणेच कार्यक्रम उत्तम व नियोजनबद्ध होता! सर्व आयोजक कार्यकर्ते, सहभागी स्पर्धक, अभिवाचक व सहकारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
पार पडलेला निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ ही अत्यंत देखणा होता.. विशेष उल्लेख करावासा वाटतो की निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या तिन्ही गटांतील स्पर्धकांचे निबंध त्यांच्या स्वतःकडून वाचून घेण्यात आले. त्यामुळे सभागृहात एक वेगळेच प्रेरणादायी व उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले. त्यांच्या विचारांची मांडणी, भाषाशैली आणि विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हा श्रोत्यांना थेट ऐकण्याची संधी मिळाली.
तसेच यानिमित्ताने आयोजित केलेले मुक्त अभिवाचनही प्रभावी ठरले. आमच्यासारख्या नवोदित हौशी अभिवाचकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आम्हाला प्रोत्साहन देण्याचे कार्य या उपक्रमातून यशस्वीपणे साध्य झाले.
कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ. वैशाली सरवणकर यांनी अभिवाचनाविषयी केलेले मार्गदर्शन अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि समर्पक होते. त्यांच्या अनुभवी व नेमक्या शब्दांतून अभिवाचनाची शैली, भाव, आशयाची परिणामकारक मांडणी यांविषयी मौल्यवान दिशा मिळाली. ज्याचा लाभ हा पुढील अभिवाचनासाठी आम्हाला नक्कीच होईल.
कुठेही अलंकारिक शब्द नाहीत, कुठलाही औपचारिकपणा न आणता सहज आणि वेगळ्या शैलीत केलेले श्री. मनोहर जुन्नरे यांनी कार्यक्रमाचे केलेले आभार प्रदर्शन प्रेक्षकांना भावले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी वाचनालय प्रमुख सौ. मीनल सावंत, निमंत्रक श्री. प्रकाश पालव, मार्गदर्शक श्री.वसंत भोसले, समितीमधील सर्व सदस्य, परीक्षक, सूत्रसंचालिका सौ.शुभदा म्हामुणकर, सहभागी सर्व विद्यार्थी, ज्येष्ठ मुलुंडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही असेच प्रेरणादायी, दर्जेदार आणि संस्कारक्षम उपक्रम आयोजित होत राहोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.






