महिला मेळावा २०२५ – स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी उत्सव

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, मंडळाच्या महिला आघाडीच्या वतीने, रविवार दिनांक १० मार्च, २०२५ रोजी महिला मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका सौ. दीपाली केळकर यांची उपस्थिती लाभली.
त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाला लाभलेल्या, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, पितांबरी, डॉ.अगरवाल आय हॉस्पिटल, वामनराव पेठे ज्वेलर्स, सारस्वत बँक, भगीरथी फूड आणि सप्तरंगी या मान्यवर प्रायोजकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन अतिशय नेटके आणि सुबोध होते.
सौ. सोनाली सावंत व सौ. शुभदा म्हामुणकर यांचे उत्तम सूत्रसंचालन, सौ. करुणा सावंत यांचे मनापासून केलेले आभार प्रदर्शन तसेच सौ. सोनल सावंत व सौ. करुणा सावंत यांनी महिला दिनाचे प्रतीक असलेली रंगीबेरंगी, आशयपूर्ण रांगोळी साकारून महिला दिन सुरेख सजवला. या
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महिला आघाडी प्रमुख सौ. माधुरीताई तळेकर आणि निमंत्रक सौ. मनीषाताई साळवी यांनी, त्यांच्या समितीसह अत्यंत चिकाटी, समन्वय आणि कल्पकतेने केले होते.

महिला मेळावा २०२५ हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तो स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा, एकात्मतेचा आणि सामाजिक जागृतीचा प्रेरणादायी अनुभव होता. महिला उद्योजिकांसाठी भव्य ग्राहक पेठ महिला सशक्तीकरण आणि स्थानिक उद्योजिकांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने, मराठा मंडळ,
मुलुंड, मुंबई दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करत असते. यावर्षी विशेषतः ऑक्टोबर आणि मार्च महिन्यांत, दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ग्राहक पेठा भरवण्यात आल्या आणि दोन्ही वेळा भरघोस प्रतिसाद मिळाला. ग्राहक पेठांचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. रमेश शिर्के यांच्या हस्ते झाले. सर्व स्टॉलधारकांचे गुलाब पुष्प, पेढे आणि सन्मानचिन्ह देऊन खास स्वागत करण्यात आले. खवय्यांची लाडके ठिकाण ठरलेली खाऊ गल्ली उत्साही गर्दीने ओसंडून वाहत होती.

संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण पसरले होते आणि प्रत्येक स्टॉलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या दोन्ही ग्राहक पेठांचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध, आकर्षक आणि यशस्वी ठरले. या यशामागे मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. रमेश शिर्के  आणि सरचिटणीस श्री. अजय खामकर यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.

तसेच मंडळाच्या सहचिटणीस सौ. ऐश्वर्या ब्रीद, महिला आघाडी प्रमुख सौ. माधुरी तळेकर, निमंत्रक सौ. मनीषा साळवी, फोटोग्राफर-व्हिडीओग्राफर श्री. कुणाल शिंदे आणि सर्व उपसमित्यांचे सदस्य यांचे अथक परिश्रम हे या यशाचे खरे शिल्पकार ठरले. या उपक्रमा मधून महिलांना एक सक्षम मंच मिळत असून, यातून स्थानीय उत्पादनांची ओळख, स्वावलंबन आणि आर्थिक प्रगतीची संधी असे सकारात्मक परिणाम ठरत आहेत.