- October 14, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
सोमवार दि. ०६ ऑक्टोबर २०२५, कोजागिरी पौर्णिमेच्या पावन दिवशी, *मराठा मंडळाचा ४७ वा वर्धापन दिन समारंभ* अत्यंत भक्तिभावाने आणि प्रेरणादायी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी मंडळात दोन भावस्पर्शी सत्रं पार पडली. एक सकाळी भावभक्तीचे आणि दुसरं संध्याकाळी कला, श्रद्धा आणि प्रेरणेचं दर्शन घडवणारं.
सकाळच्या सत्राची सुरुवात *श्री सत्यनारायण महापूजेने* झाली. श्रद्धा, भक्तीने परिपूर्ण अशा या पूजेमध्ये मंडळाचे सभासद तसेच अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पूजेची देखणी सजावट, पवित्रतेने भारलेलं वातावरण आणि अतिशय सुयोग्य नियोजनात महापूजा सुफळ संपूर्ण पार पडली. पूजेनंतर आपुलकीच्या आणि स्नेहपूर्ण वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
संध्याकाळचं सत्र म्हणजे खरंच एक वेगळीच अनुभूती! दिव्यांग कलाकारांनी सादर केलेला कराओकेवर आधारित *“जागर देवीचा”* हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा, श्रद्धा आणि प्रेरणेने भारावणारा ठरला. या कलाकारांनी आपल्या मर्यादांवर मात करत जो आत्मविश्वास, जोश आणि कला सादर केली, ती प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारी होती. गाण्यांमधून उमटणारी भक्ती आणि जिद्द काळजाला भिडणारी आणि प्रेरणादायी होती. या दिव्यांग कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या सौ.*श्रद्धा देसाई* यांचे विशेष आभार आणि अभिनंदन! त्यांनी घेतलेला १००० कार्यक्रम सादर करण्याचा संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करण्याची त्यांची भावना लवकरच पूर्ण होवो हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रमुख मार्गदर्शक मंडळाचे अध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सर्व कामकाज समित्यांचे सदस्य यांच्या सहकार्याने, सांस्कृतिक विभाग समितीच्या प्रमुख सौ. रश्मी राणे, निमंत्रक सौ.करुणा सावंत आणि समिती सदस्यांनी अत्यंत मोलाचं योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडले.
मराठा मंडळाचा ४७ वा वर्धापन दिन हा केवळ एक उत्सव नव्हता, तो एक भावनात्मक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रवास होता, जो प्रत्येकाच्या हृदयात कायमचा घर करून राहील… !
शब्दांकन : सौ. ऐश्वर्या ब्रीद
