- January 1, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई येथे काल *“निरोगी मुलुंड”* या उपक्रमांतर्गत तृणधान्यांचे आपल्या जीवनशैलीतील महत्त्व तसेच जीवनशैलीजन्य आजारांवर तृणधान्यांची भूमिका या विषयावर एक अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात डॉ. नितीन पाटणकर, डॉ. रुचिता राणे, वैद्य अश्विन सावंत आणि डॉ. होस्कोटे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने उपस्थितांना तृणधान्यांचे महत्त्व नव्याने समजावून सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात तृणधान्य/millets म्हणजे काय आणि कोणकोणती धान्ये तृणधान्यांच्या गटात मोडतात, यापासून झाली. सध्या आपल्या दैनंदिन आहारात प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या भात आणि गहू यामधील पोषणमूल्ये- जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर यांचे प्रमाण- याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर काळाच्या ओघात आपल्या जेवणातून हळूहळू गायब झालेली ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, सावा, कोद्रा, राजगिरा, रानशेवरी, भगर, कुट्टू यांसारखी अनेक पारंपारिक तृणधान्ये पोषणदृष्ट्या किती समृद्ध आहेत, हे डॉक्टरांनी सोप्या उदाहरणांतून स्पष्ट केले.
या व्याख्यानांतून एक महत्त्वाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला की, केवळ पोट भरण्यापुरता मर्यादित झालेला आधुनिक आहार आपल्याला दीर्घकालीन आरोग्य लाभ देत नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, पचनसंस्थेचे विकार यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर तृणधान्यांचा नियमित वापर कसा उपयुक्त ठरतो, याची शास्त्रीय माहिती डॉक्टरांनी दिली. विशेष म्हणजे हे सर्व विषय इतक्या सहज, सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडले गेले की प्रेक्षकांमध्ये हास्य, कुतूहल निर्माण होत होते.
डॉक्टरांच्या ‘प्रेक्षकांशी थेट संवाद’ साधण्याच्या शैलीमुळे उपस्थितांनीही उत्स्फूर्तपणे चर्चेत भाग घेतला. कार्यक्रमाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टर होस्कोटे सरांनी सुचवल्या प्रमाणे श्री लक्ष्मी केटरर्स यांनी वरीपासून बनवलेला उपमा, डॉ. होस्कोटे यांनी स्वतः आणलेले तृणधान्यांपासून तयार केलेले श्रीखंड(मिल्लीखंड) आणि चकली असा अल्पोपहार यांचा आस्वाद प्रेक्षकांनी मनापासून घेतला. “आरोग्यदायी आहार म्हणजे चव नसलेला” हा गैरसमज या अल्पोपहाराने पूर्णपणे दूर केला. यावेळी डॉक्टरांनी काही सोप्या, घरच्या घरी करता येणाऱ्या पाककृतीही सांगितल्या. तृणधान्यांवर आधारित पाककृती यांच्यावर पुढे एक कार्यशाळा आयोजित करण्याचा विचारही मराठा मंडळाने यावेळी केला.
एकूणच हा कार्यक्रम अत्यंत उत्तम, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला. तृणधान्यांकडे केवळ ‘जुने धान्य’ म्हणून न पाहता ‘भविष्यातील आरोग्याची गुरुकिल्ली’ म्हणून पाहण्याची नवी दृष्टी या कार्यक्रमातून उपस्थितांना मिळाली. “निरोगी मुलुंड” हा कार्यक्रम उपस्थित प्रत्येकाच्या मनात तृणधान्ये पुन्हा आपल्या स्वयंपाकघरात आणण्याची जाणीव जागवणारा ठरला.
शब्दांकन : सौ. ऐश्वर्या ब्रीद
