- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुलुंडमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा दिवस नववर्ष दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करताना, आधुनिक विचारांशी सांगड घालून भारताला सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून घडविण्याच्या उद्देशाने समाजात
एकता निर्माण व्हावी, या हेतूने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३० मार्च २०२५ रोजी आयोजित या स्वागत यात्रेत मराठा मंडळाचा नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त सहभाग होता.
मंडळाच्या सांस्कृतिक विभागाच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, सभासद, हौशी कलाकार व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. महिलांनी पारंपरिक वेशभूषा-नऊवारी साडी व डोक्यावर फेटा परिधान करून ढोल-ताशांच्या गजरात विविध पारंपरिक कलाप्रदर्शन सादर केले. अभंग, भजन, वारकरी नृत्य, फुगड्या, झिम्मा आदी प्रकारांनी यात्रेची रंगत वाढवली. पुरुष वर्गही झेंडे हातात घेऊन सक्रियपणे सहभागी झाला होता. मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही स्वागत यात्रा मुलुंडवासीयांसाठी दरवर्षीप्रमाणेच आकर्षणाचे केंद्र ठरली.