- October 27, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी “दिवाळी पहाट ” निमित्त मराठा मंडळ आयोजित महाराष्ट्रातील लोककलेचे विविध रंग उधळणारी, शाहीर श्री. मधुकर खामकर यांची संकल्पना व लेखणीतून सादर झालेली “शाहिरी दिवाळी” मोठ्या दिमाखात साजरी झाली.
गणेश वंदनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला.वासुदेव,गवळण,गोंधळ, शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरील जन्म, संत रामदास यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक, शेतकऱ्यांचे बैलजोडीवरील गाणं,जेजुरी- खंडोबा- मुरळी नृत्य, जांभुळ पिकल्या पानावरी व विठोबाचा डोंगुर आभाळी गेला यावर आदिवासी नृत्य, यल्लमा देवी-रेणुका देवी यांचे जोगवा नृत्य, पहिलं नमन या गीतावर शाहीर खामकर यांचे ढोलकी वादन, पतंग उडवीत होते, कुण्या गावात आले पाखरू, खेळताना रंग बाई होळीचा अशी लावणी गीते व नृत्य, रत्नागिरीचे बाल्या नृत्य, बहिणाबाई शेतावर काम करण्यासाठी टोपलीतून आपल्या मुलाला नेतानाची नृत्य नाटिका , कोळी नृत्य- एकविरेची पहात होते वाट , कोलीवाड्याची शान आई तुझं देऊल. अशी सरस नृत्ये व गीते सादर झाली. प्रत्येक कलाकार आपली अदा व्यवस्थित पार पाडत होता. कोठेही गोंधळ नाही.
या कार्यक्रमात मराठा मंडळातील महिलांनी अचानक एन्ट्री घेऊन विविध खेळांनी युक्त असे बहारदार नृत्य सादर केले. ऐश्वर्या व टीमचा जोश पाहण्यासारखा होता.
दिवाळी पहाट मध्ये श्री. मधुकर खामकर आणि त्यांच्या समुहाने लोकगीत, लावणी, भारुड, गोंधळ, बाल्या नृत्य, महाराष्ट्र गीत असे एक एक वेगवेगळे पैलू उलगडून दाखवत महाराष्ट्र साहित्य आणि लोककलांमध्ये किती संपन्न आहे. याची प्रचिती घडवून आणली.
पूर्णपणे अंतर्मनात भिनलेल्या या लोककलांच्या सादरीकरणासाठी कोणत्याही कलाकाराला स्क्रीप्ट किंवा लिहिलेला पेपर लागला नाही. हे विशेष. शंभर पैकी शंभर मार्क द्यावे अशा पध्दतीने सर्वांनी जीव ओतून काम केले.शाहिर मधुकर खामकर वयाची ७६ वी पार करुन देखील आवाजातला खणखणीतपणा, रांगडेपणा या सोबत उत्तम अचुक शब्द फेकीत वातावरण निर्मिती करण्याची त्यांची कुवत, तरुणांना लाजवणारी होती. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर ते नक्कीच लक्षात येईल.
महाराष्ट्रातील लोकधारा ही संकल्पना व त्या अनुषंगाने निवडलेली उत्तम गीते होती. स्टेजवर नृत्य आणि गीते यांचा मेळ छान जमला. गाणार्या कलाकारांना सलाम ! सर्व गाणी सुरात गायली. लाईव्ह संगीत लाजवाब! सर्व नृत्यांगनांची मुद्राभिनय सुंदर ! पुरुष कलाकारांची जोशपूर्ण नृत्य !
शाहीर श्री. मधुकर खामकर यांची ऊर्जा व उत्साह वाखाणण्यासारखा होता. हातात एकही कागद नाही, चोख पाठांतर ! आपली ७५ जरी झाली तरी मी म्हातारा नाही तर शाहिरातील मी एक “महा तारा” आहे असे सांगण्यास ते विसरले नाहीत.
“मराठा मंडळ मुलुंड,मुंबई” आयोजित दिवाळी पहाटचा कार्यक्रम अनुभवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ही केवळ एक सांस्कृतिक मैफिल नव्हे, तर एक भावनिक प्रवास होता, जो महाराष्ट्राच्या लोककलेच्या विविध रंगांनी मनाला भिडून गेला.
उत्कृष्ट संकल्पना, अभ्यासपूर्ण सादरीकरण आणि नृत्य-संगीत यांचा नेत्रसुखद संगम ह्या सगळ्याचा एक परिपूर्ण ताळमेळ आज शाहिरी दिवाळीत पहायला मिळाला. कार्यक्रमाची सुसंघटित मांडणी, सुरेल गायन, भावपूर्ण नृत्यं, आणि रंगमंचावर साकारलेले प्रत्येक सादरीकरणातील प्रत्येक क्षण हे प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसले.
कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळीच ऊर्जा आणि समर्पण जाणवत होतं. कलाकारांचा आत्मविश्वास, वाखाणण्याजोगा होता.आणि… स्वतः शाहीर खामकर काका सर्वांत तरुण….. शाहिरी दुनियेतील “महा तारा”! दमदार आणि रांगडा आवाज…शाहीर खामकर काकांना मानाचा मुजरा!!
अशा कार्यक्रमांतून आपल्या मातीतल्या परंपरा, लोकधारा, श्रद्धा आणि संस्कृती यांना नवसंजीवनी मिळते आणि आजच्या आपल्या पहाटेने हे सिद्ध केलं.
मराठा मंडळातील कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम रांगोळ्या आणि सजावटी या कलाकृती आजच्या कार्यक्रमाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या होत्या. श्री. पप्या(आत्माराम )मोरे यांची लोकसंगीतावर आधारित संकल्पना आणि त्या अनुषंगाने केलेली मांडणी हे कार्यक्रमाचे एक वेगळेच आकर्षण ठरले. त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वच कलाकारांचे आणि स्वयंसेवकांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे व उल्लेखनीय होते जे प्रत्येक पैलू मध्ये दिसून येत होते.
कार्यवाह श्री. अजय खामकर यांनी शाहीर श्री. मधुकर खामकर यांचा अनेक पुरस्कारांसहीत केलेला परिचय व आभार प्रदर्शन यथायोग्य ! मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री शिर्के सरांचे नेहमीप्रमाणे खुसखुशीत मनोगत ! ऐश्वर्याची रांगोळी अप्रतिम ! शाहीर श्री.मधुकर खामकर यांच्या शिष्यांनी त्यांच्या ७५ निमित्त केलेला अप्रतिम वाढदिवस सोहळा ! जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली
इतका सुंदर कार्यक्रम बघितल्याचे समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. त्यावर चाळके केटरर्स त्यांची पोटे तृप्त केली.
