- July 21, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मुलुंड (पश्चिम) येथील शांती कँम्पस सोसायटीतील माझ्या बैठकीच्या खोलीतील सोफ्याच्या डाव्या बाजूचा कोपरा माझा आवडता आहे.मी जिथे बसतो तिथे समोर आईदादांचे छायाचित्र आहे.डाव्या बाजुला गणपती बाप्पा आहेत.या कोपर्यात बसल्यावर कामाचा सगळा शीण निघुन जाऊन जास्त ताजेतवाने व खूप प्रसन्न वाटते.उत्कंठा जागी होते.सकारात्मक विचारही येतात.मुंबईतील लोकप्रिय असलेला “महाराष्ट्र टाइम्स” वाचायची हीच जागा.म.टा.सिटीझन रिपोर्टर असल्यामुळे सहजसोप्या ॲपच्या माध्यमातुन नागरिकांना रोजच्या जगण्यात भेडसावणार्या नागरी समस्या मांडत असे.
प्रशासनही अशा समस्यांचे तत्परतेने निराकरण करत असे.४-५ वर्षापुर्वी “आपला आवाज” असे एक सदर म.टा.ने चालु केले होते.मी याच कोपर्यात बसुन त्या सदरासाठी नियमितपणे माझे मत व्यक्त करीत असे, त्याला म.टा फोटोसहीत प्रसिद्धी देत असे.असा हा माझा आवडता कोपरा.याच जागेवर बसुन मुंबई पोर्ट ट्रस्ट,फिलान्थ्रोपिक फाऊंडेशन,मराठा मंडळ मुलुंड,मुंबई व अपना बाजार को-ऑप.मुलुंड या नामांकित संस्थेची कामे निवांतपणे करत असे.
कोरोना टाळेबंदीच्या काळात (२०२०-२०२३) आलेले रिकामपण आणि त्यातुन आलेल्या नैराश्यावर मात करण्याचा उपाय म्हणुन याच जागेवर बसुन आमच्या मुलुंड मराठा मंडळाच्या व्हाॅटस अप ग्रुप वर आठवड्यातुन दोनदा शब्दकोडे पोस्ट करत असे.या शब्दकोड्यांनी बघता बघता द्विशतकी टप्पा गाठला. तसेच मला भावलेले सुविचार रोज दुपारी पाच वाजता पोस्ट करतो त्यांचाही लवकरच २००० चा टप्पा पुर्ण होईल.हे सर्व मी या माझ्या आवडत्या कोपर्यात बसुन करत असतो.तसेच ऑनलाईन प्रश्नमंजुषा सोडविण्याचा मला छंद आहे व आतापर्यंत सुमारे ५०/६० डिजिटल प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
सध्या एक्स X (पूर्वीचे ट्विटर) यावरही संवाद साधत असतो.तसेच गूगल मॅप्सवर “लोकल गाईड” म्हणुन नं.७ लेवलवर आहे.आतापर्यंत जवळजवळ नऊ लाखांपर्यंत माझ्या छायाचित्रांना व्हुज मिळाले आहेत. अशाप्रकारे माझे छंद या जागेवर बसून पुर्ण करत असतो व जगण्याचा मनसोक्त आनंद लुटतो.
अरूण विठ्ठल चव्हाण, मुलुंड (पश्चिम).
*महाराष्ट्र टाइम्स* वृत्तपत्राच्या पुरवणीत माझा हा लेख सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध झाला आहे.
