माझी ऑलिंपिक धाव……!

आजीच्या शेवटच्या दिवसात, तिच्या भेटीसाठी मी आणि माझा भाऊ गावी गेलो होतो. काकांकडे रात्रीच्या जेवणानंतर भाऊ आणि मी अंधारात मळ्यांमधील पायवाटेने मूळ घराकडे परतत होतो. गावात हल्ली वाघ दिसतो, ही चर्चा आधीच कानावर पडलेली, त्यामुळे मनात वाघाच्या भीतीचं सावट होतं.
.
भावाच्या हातात बॅटरी होती. तो बॅटरी एकदा समोर आणि नंतर पायाखाली मारत माझ्यासोबत चालत होता. अंधार घनदाट, आवाज फक्त आमच्या पावलांचा. मनात स्वामींचा जप. आणि..अचानक भावाने मला बाजूला झटका दिला आणि…. आणि काय सांगू… मी जी धूम ठोकली थेट मूळ घरात!
काकांना सांगितलं – “लवकर दारं, खिडक्या बंद करा!”  
.
भाऊही मागून धावत आला. थोडा दम घेतल्यावर त्याने विचारलं, “अचानक, एकटी  एवढ्या जोरात पळत का सुटलीस? मला काही कळलं नाही. मी सुद्धा धावत सुटलो.”  मी म्हटले “अरे,वाघ,वाघ होता ना,  मग?”
म्हणाला “कुठे??? अरे वाघ नाही, फुरसे होते!  बॅटरीच्या झोतात तुझ्या पायाखाली सरपटताना दिसले. तुझा पाय पडेल म्हणून तुला ढकललं.”  
आणि त्या क्षणी माझा थरार संपला. जीव भांड्यात पडला आणि एकच हशा सुरु झाला!  
वाघ नव्हता, पण फुरसे पुरेसे होते जीव हादरवायला!
.
काय थरार होता तो! आजही आठवलं तरी अंगावर शहारा येतो आणि हसू फुटतं.
कायम आठवणीत राहिली आहे, पी.टी.उषाला सुद्धा मागे टाकेल अशी ठोकलेली माझी ऑलिंपिक धाव!
.

ऐश्वर्या ब्रिद
२५/०४/२०२५